मुंबई: मुंबई जवळ असलेल्या मीरा-भाईंदर येथील एका सोसायटीमध्ये राहणारा एक व्यक्ती कुर्बानीसाठी बकरा घेऊन आला होता. सोसायटीच्या सदस्यांचा याला विरोध होता. त्यावरुन त्या सोसायटीत वाद सुरु झाला. घटनास्थळी दोन्ही बाजूने मोठा जमाव जमा झाला. दोन्ही गटांनी आपआपल्या लोकांना बोलावलं. दोन्ही बाजूकडून शाब्दीक बाचाबाची झाली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. संबंधित प्रकार पोलिसांना समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सोसायटीने कुर्बानीची परवानगी दिली नव्हती. मात्र, तरीही जबरदस्ती लिफ्टमधून २ बकरे आणल्याचा आरोप आहे. सोसायटीच्या सदस्यांना याबद्दल समजल्यानंतर संध्याकाळी ६ वाजल्यापासून सर्व वादाची सुरुवात झाली. मंगळवारी रात्री ११ वाजता परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना लोकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. सध्या मीरा-भाईंदर या भागात ताण तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस आहेत. दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे.