मसुरे प्रतिनिधी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे ग्रामपंचायत कुणकेश्वरच्या वतीने तीन महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचा एकाच दिवशी लोकार्पण सोहळा पार पडला. पर्यटकांची वाढती गरज ओळखून पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि शाश्वत सुविधांकडे टाकलेले हे पाऊल ग्रामविकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरत आहे.
कुणकेश्वर देवालय परिसरात उभारण्यात आलेल्या RO वॉटर प्लांटचे लोकार्पण एकनाथ तेली यांच्या हस्ते करण्यात आले. या प्लांटमुळे ग्रामस्थ व पर्यटकांना फक्त १ रुपये प्रति लिटर दराने शुद्ध, स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध होणार आहे. उन्हाळ्यातील पाण्याच्या गरजेवर हा उपक्रम दिलासा देणारा ठरणार आहे.

पर्यावरणसंवर्धन व हरित ऊर्जेला चालना देत, EV चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण संजय आचरेकर यांच्या हस्ते झाले. या सुविधेमुळे दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी जलद चार्जिंगची व्यवस्था उपलब्ध होऊन, पर्यटक व स्थानिक वाहनधारकांना मोठा लाभ होणार आहे. कुणकेश्वर भक्तनिवास परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी उभारलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण चंद्रकांत घाडी यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे स्वच्छता, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षणाला चालना मिळणार आहे.

या तिन्ही लोकार्पण कार्यक्रमांना ग्रामपंचायत कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. धार्मिक पर्यटन, पर्यावरणपूरक सुविधा आणि आधुनिक पायाभूत सोयी यांचा संगम साधत कुणकेश्वर ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, सदस्य आचरेकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय आचरेकर ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री एकनाथ तेली .श्री पेडणेकर, श्री. रामदास तेजम , ट्रस्टी श्री. श्रीकृष्ण बोंडाळे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. ऋषिकेश चव्हाण , श्री. राजेंद्र तेली,श्री. मंगेश मेस्त्री, श्री. अमित सावंत, श्रीम. प्रियांका चव्हाण, श्रीम. दीपश्री दळवी, ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.







