कुडाळ: कुडाळ तालुका भौगोलिक, महसूलदृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठा तालुका आहे.त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून जिल्ह्यातील नवीन 59 तलाठी सजांपैकी एकट्या कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 23 तलाठी सजांची तसेच 4 महसुली मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे.तलाठी कार्यालय ही गावाची शान आहे.या नवीन तलाठी सजा कार्यालयाची निर्मिती करण्यात आल्याने आता गावांमधील नागरिकांना आता सातबारा व इतर कामे गावातच करणे सोयीची होणार आहेत.नवीन तलाठी सजांमध्ये स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असे प्रतिपादन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील आकेरी-हुमरस गावातील तलाठी सजा कार्यालयाचे उदघाटन मंगळवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी आकेरी-हुमरस या गावांचे तलाठी सजा हे झाराप येथे असल्याने गावातील नागरीकांना सातबारा व इतर नोंदीसाठी लांबीचा पल्ला गाठावा लागत असे यामुळे लोकांना नाहक त्रास व ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत असे त्यामुळे आकेरी-हुमरस साठी स्वातंत्र्य तलाठी कार्यालय मिळावे अशी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती याबाबत ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला असता आमदार वैभव नाईक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून आकेरी-हुमरस गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर करून दिले आहे.याबाबत ग्रामस्थ व शिवसैनिकांनी समाधान व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
उदघाटनाप्रसंगी बोलताना आ.नाईक म्हणाले,तलाठी कार्यालय ही गावाची शान आहे या नवीन तलाठी सजा व मंडळांची निर्मिती करण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचेही योगदान आहे.या तलाठी सजा व मंडळांच्या निर्मितीमुळे या गावांमधील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तालुक्यात संगणकीय सातबाराचेही काम प्रगतीपथावर आहे.कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच नवीन तलाठी सजांमध्ये स्वतंत्र तलाठी पदाची भरती करून स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आ.नाईक यांनी यावेळी दिली.तसेच ज्या तलाठ्यांवर इतर सजांचा कार्यभार देण्यात आला आहे त्यांनी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस गावासाठी तलाठी सजामध्ये उपस्थित राहावे अशी सूचना त्यांनी केली.यापुढील काळात देखील या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आ.नाईक यांनी दिली.
यावेळी कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी, सरपंच महेश जामदार,उपसरपंच गुरुनाथ पेडणेकर,संदीप राणे, बाळकृष्ण राउळ,सुरेश चव्हाण,रेवती राणे,सूर्या घाडी,उमेशकुमार परब, प्रमोद घोगळे,मेघा गावडे,सखाराम गावडे,रुपेश गावडे,अशफाक कुडाळकर,मधुकर घाडी आदी ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.