मसुरे प्रतिनिधी: कणकवलीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व किशोर कदम यांची झिम्माडमहोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. झिम्माड महोत्सवाच्या संयोजिका व महाराष्ट्र कला रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक यांनी याबाबतची घोषणा केली आहे.कणकवलीतील कलमठ या गावी राहणारे किशोर कदम जिल्हा परिषदेच्या ओसरगांव येथील शाळेत मुख्याध्यापक आहेत. दुसरीत शिकत असताना त्यांचं पितृछत्र हरपलं. वडिल कणकवली एसटी स्टॅन्डवर हमाली करत. मुलांना शिकवण्याची जिद्द ते बाळगून होते. पण त्यांचं अकाली निधन झालं आणि किशोर व त्यांच्या बहिणीचा शिक्षणाचा मार्ग खडतर झाला. त्यावर मात करत दोघेही शिकले. कणकवलीतील वसतीगृहात राहून किशोर यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचं एमए बीएड शिक्षण झालंय. लेखनवाचनाची आवड असलेले किशोर कदम एक उत्तम साहित्यरसिक आहेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महासचिव आहेत. फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.
किशोर कदम यांची रसिकता त्यांच्या मुलांमध्येही उतरली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांची मुलगी आर्या शालेय वयातच जिल्ह्याची सर्वोत्कृष्ट वक्ता आहे. तिच्याकडून तयार करून घेतलेल्या भाषणांचं किशोर कदम यांचं पुस्तक अलिकडेच प्रकाशित झालंय. किशोर कदम यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनने महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवलं आहे. कोल्हापूरच्या जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचा पर्यावरण जागृती गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. किशोर कदम यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.