पुणे: मावळ परिसरातील उद्योगपती आणि जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे यांच्या खून प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-२ च्या पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्यास्वाधीन केल्याची माहिती पुणे शहर गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे. नाना उर्फ संदिप विठ्ठल मोरे (रा. पंचतारानगर, संभाजी चोक, गणेश मंदिरजवळ, आकुर्डी ) असे पुणे शहर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन केलेल्याचे नाव आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी माहिती दिली. शुक्रवारी भरदुपारी किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या समोर गोळयाघालून आणि कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला होता. मारेकरी कोयत्याने वार करीत असलेले व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस मारेकर्याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत.