Home स्टोरी किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाचे ४ फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंच्या हस्ते...

किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाचे ४ फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण…! हरी खोबरेकर

88

मालवण प्रतिनिधी: साडे तीनशे वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या आणि छत्रपतींची मुर्ती असलेले एकमेव मंदिर असलेल्या किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाचे लोकापर्ण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपतींच्या नावे राजकारण करणारे स्वतःला युगपुरूष म्हणवून घेत असताना किल्ले सिंधुदुर्गला अगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देऊन अभिवादन करण्याचेही सौजन्य दाखवू शकले नाहीत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख राज्याच्या दौऱ्यावर जाण्यापुर्वी छत्रपतींचा आशिर्वाद घेण्यासाठी थेट येथे येत आहेत.छत्रपतींना अभिवादन केल्यानंतर येथील बंदरजेटी याठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

श्री. खोबरेकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ४ फेब्रुवारीला तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा असल्याने कार्यकर्त्यांचे त्यांच्या मार्गदर्शनाकडे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २.३० वाजता शहरातील देऊळवाडा याठिकाणी येणार आहेत. तेथून तालुका शिवसेनेच्यावतीने भव्य स्वागत केल्यानंतर मोटारसायकल रॅलीने शासकीय विश्रामगृह येथे रवाना होणार आहे. वाटेत नाक्यानाक्यांवर भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच भरड नाका याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता बंदरजेटी येथून सिंधुदुर्ग किल्ला येथे रवाना होणार आहेत. किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी छत्रपतींना अभिवादन आणि सिंहासनाची पूजा करून लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याठिकाणी किल्ला रहिवासी संघ आणि वायरी भूतनाथ ग्रामपंचायत यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. परतीवेळी बंदरजेटी याठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून दिव्यांग बांधवांना मोटारसायकलचे वाटप होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता आंगणेवाडी येथे प्रयाण करून देवी भराडी मातेचे दर्शन घेणार आहेत. यावेळी शिवसेनेच्यावतीने आंगणेवाडी येथेही स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे असे श्री. खोबरे यांनी स्पष्ट केले.