मसुरे प्रतिनिधी: राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी यांच्या वतीने ऐतिहासिक मसुरे येथील भरतगड किल्ल्यावर दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम नुकतीच उत्साहात पार पडली. या मोहिमेसाठी रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर छ. संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग येथून ३५ मावळे आणि रणरागिणी स्वखर्चाने उपस्थित राहिले होते. राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र हि संस्था संपूर्ण महाराष्ट्रात ३१ जिल्ह्यात कार्यरत असून किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक महिन्याला अशा प्रकारच्या मोहिमांचे आयोजन करण्यात येते.
राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या रत्नागिरी विभागामार्फत किल्ले जयगड येथे २०१६ पासून गड संवर्धनाचे शिवकार्य अविरतपणे सुरू आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून गड संवर्धनाचे काम सुरू व्हावे या उद्देशाने फेब्रुवारी महिन्या पासून किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहीमेचे यशस्वीपणे आयोजन केले होते. मसुरे येथील किल्ले भरतगडावरील या पहिल्याच मोहिमेत गड परिसर आणि समोरील भागातील कचरा संकलन, तणनियंत्रण, पायऱ्यांवरील व तटबंदी वरील झाडेझुडपे हटविणे, बालेकिल्ल्या मधील प्रवेशद्वार ते मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावर स्वच्छता ठेवून पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर आणि गावातील नागरिकांना शिवकार्याबद्दल जागरूक करण्यासाठी शिवगर्जना फेरी काढून या पुढील मोहिमेत सहभाग वाढविण्यासाठी आवाहन करण्यात आले. या मोहिमेत ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन, इतिहासप्रेमी तसेच भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विशेष सहकार्य लाभले. आचरा रहिवासी अमित राजन गांवकर यांकडून या मोहिमेत सहभागी मावळे व रणरागिणी साठी चहा, नाष्टा व जेवण साहित्य मोफत पुरविण्यात आले. मोहिमेच्या अखेरीस किल्ल्याच्या इतिहासाविषयी चर्चा घेऊन पुढील काळात सातत्याने भरतगडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवक, स्थानिक प्रशासन व किल्लेप्रेमींचे राजा शिव छत्रपती परिवार, रत्नागिरी तर्फे विशेष आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे राजा शिवछत्रपती परिवार आणि ट्रेकगुरु संस्था यांच्या सहकार्याने यापुढेही प्रत्येक महिन्यात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. सर्व सिंधुदुर्ग वासियांनि या मोहिमेत मोठ्या संख्येने शिवकार्यासाठी एकत्रित येऊन ही शिवस्मारके स्वच्छ आणि संवर्धन करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
पुढील महिन्यातील मोहिमेच्या माहितीसाठी तसेच शिवकार्यात सहभागी होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवार तर्फे प्रविण परब मो.७५८८६१०८८७, अरुण मोरे यांना संपर्क करण्याचे आवाहन येथील शिवप्रेमीना करण्यात आले. या मोहिमेमध्ये दिनेश कुर्टे, अलंकार मयेकर, तुषार फोडकर, अरुण मोरे, अनंत गावडे, नितीश हातिसकर, अपूर्व शिर्के, अमोल पवार, मयुर भोतळे, शुभम आंग्रे, सचिन जाधव, प्रविण परब, मनिषा परब, अन्वि परब, राजु चिरमुले, वैष्णवी चिरमुले, क्षितिजा चिरमुले, स्वराली चिरमुले, दर्शन शेळके, गौरव रेमजे, अमोल साळवी, स्वप्निल सावंत, निखिल चव्हाण, प्रकाश जेठे, सर्वेश खरात, रुपेश मस्के, संदेश शिगवण, योगेश इंगळे, रुद्र कुर्टे, प्रतीक जेधे, शैलेश जाधव, मंदार सरजोशी, मानसी सरजोशी सहभागी झाले होते. भरतगड इंग्लिश मीडियम आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने या मोहिमेसाठी विशेष सहकार्य करण्यात आले. या मोहिमेमुळे ऐतिहासिक मसुरे भरतगड किल्ल्याचे जतन होण्यास मदत होणार असून येणाऱ्या पर्यटकांनाही स्वच्छ सुंदर अशा भरतगडाचे दर्शन होणार आहे.