Home स्टोरी कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्स्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न.

कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्स्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न.

30

मसुरे प्रतिनिधी: ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय महिला अधिवेशन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.आकाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महाड क्रांतीभूमीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (बार्टी) येथे संपन्न झाले. सकाळी महाड क्रांतीभूमीतील चवदार तळ्याला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्पा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विचारमंचावर उपस्थित मान्यवर स्त्री शिक्षिकांचा आणि राज्य संघटना सदस्यांचा स्वागतपर सन्मान राज्याध्यक्ष श्री.आकाश तांबे यांचे हस्ते करण्यात आला. त्यानंतर नियोजित परिसंवादाला सुरुवात झाली. स्त्री:सामाजिक लोकशाहीची नायिका या विषयावर मनोगत व्यक्त करताना आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासक, लेखिका गीतांजली साळवी म्हणाल्या की, प्राचीन काळापासून आपण संत साहित्याचा अभ्यास केला तर स्त्री हीच समाजविकासाचे मुख्य केंद्रबिंबू असल्याचे आपणास आढळेल. संत निर्मला, संत जनाबाई अशा अनेक स्त्री संतांनी सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्या काळात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेकांनी आपल्या साहित्यातून सामाजिक प्रबोधनाचा विचार मांडला. अनेक रुढी परस्परांविरुद्ध, सती प्रथा, केशवपन, स्त्रीचे शोषण अशा पुरुषप्रधान प्रवृत्तीवर प्रहार केला. पुढे संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम आदी संतांच्या नामावळीत स्त्री सुधारक महिलांचा सुद्धा उल्लेख आढळतो. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला आधी शिक्षण दिले. म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिबा शेख अशा कितीतरी महान स्त्रियांनी सामाजिक चळवळीत झोकून घेतले. स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. संत साहित्य, लोकसाहित्य ते आजच्या आधुनिक काळापर्यंत अनेक महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान विसरून चालणार नाही. म्हणूनच स्त्री हीच खरी सामाजिक लोकशाहीची नायिका आहे असे मला वाटते. असा विचार श्रीम. साळवी यांनी मांडला. त्यानंतर अभिनेते आणि आंबेडकरी चळवळीचे युवा व्याख्याते श्री.निलेश पवार यांनी या परिसंवादाची सूत्रे पुढे मांडताना सांगितले की, स्त्री ही सामाजिक लोकशाहीची नायिका समजून घेताना आपणास तीन टप्प्यांचा विचार करावा लागेल. स्त्री ची पारंपरिक प्रतिमा ,तिचे सामाजिक योगदान आणि लोकशाहीची नायिका म्हणून तिचे महत्त्वपूर्ण कार्य डोळ्यासमोर आणावे लागेल. यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही विषयक भूमिका नीट समजून घ्यावी लागेल.

सामाजिक आर्थिक आणि राजकीय लोकशाही हे बाबासाहेबांच्या आयुष्याचे ध्येय होते. सामाजिक लोकशाही शिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ उरणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. या सामाजिक लोकशाहीचा केंद्रबिंदू भारताच्या संविधानामार्फत नागरीक म्हणजेच व्यक्ती झाला. एक मत एक मूल्य ही गोष्ट सर्वश्रेष्ठ ठरली. याच व्यक्तीला आईचेच संस्कार जास्त परिणामकारक होतात. असे प्रतिपादन करत श्री.पवार पुढे म्हणाले की, घरातील आपली आई जे संस्कार करेल त्यावरच सामाजिक लोकशाहीचे अभिसरण जास्त वेगवान आणि सुदृढ होईल. निसर्गतः स्त्रीकडे नेतृत्व आणि मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन एक कौशल्य उपजतच असते. व्यवहारिक जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीचे नेतृत्व आणि मॅनेजमेंट दिसून येते. या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार केला तर खऱ्या अर्थाने स्त्री हीच सामाजिक लोकशाहीची नायिका आहे‌. सामाजिक लोकशाही मधून बंधुत्व आणि मैत्री जास्त गतिमान होण्यासाठी स्त्री ही एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. असे अभ्यासपूर्ण आणि आपल्या ओघवत्या शैलीत परिसंवादात आपले विचार व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर

दुसर्‍या सत्रात खुले चर्चा सत्र पार पडले, आंबेडकरी चळवळीत महिलांचे योगदान या विषयांवर अनेक महिलांनी आपले मुक्तपणे विचार मांडले. यामध्ये माधुरी तांबे(सिंधुदुर्ग), सुषमा मोरे (सातारा), अहिल्या कांबळे (सोलापूर), संगिता कांबळे (सांगली), वर्षा वाघमारे (यवतमाळ), हेमलता कुर्डुकर (कोल्हापूर), सुवर्णा ओंबासे (मुंबई), स्मिता तांबे (रायगड), बेबीताई जाधव (महाड), सुप्रिया शिर्के (महाड) यांचा खुल्या चर्चासत्रात सहभाग होता. कांचन सावंत (सातारा) यांनी काव्यवाचन करुन जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद केले.

राज्याध्यक्ष श्री.आकाश तांबे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांना आणि संघटनेच्या राज्य सदस्यांना संबोधन करताना सांगितले की, महिला या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीतील प्रमुख शक्तीस्थाने आहेत. याच नारीशक्तीतून उद्याचा बलशाही भारत घडतो आहे. यासाठी आजच्या काळातील प्रत्येक स्त्रियांनी पारंपरिक बंधने झुगारून पुढे यायला हवे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघशक्तीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची चळवळ पुढे न्यायला हवी. आणि हे काम आपल्यासारख्या सुशिक्षित स्त्रियांनी आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री शिक्षिकानी पुरुषांच्या बरोबरीने या कार्यात सहभागी व्हावे. असे मौलिक विचार मांडले.यावेळी उपस्थित सर्व महिला शिक्षकांनी श्री.तांबे यांच्या या सर्वहारा नेतृत्वगुणांचे कौतुक करून त्यांचा सामुहिक सन्मानही केला.

या जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्य करणाऱ्या महिलांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार आणि माता रमाई आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांचे हस्ते सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यामध्ये राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार विजेत्या श्रीम. सरोज गंगाराम तांबे (सिंधुदुर्ग) ,सुवर्णा शशिकांत ओंबासे(मुंबई ), चित्रा डहाके (यवतमाळ), सुषमा प्रशांत मोरे (सातारा), रोहिणी मनिष कळके (सातारा), दिपिका दिलीप तांबे (रत्नागिरी), गोदावरी शिंगणकर (महाड), रमा प्रमोद काकडे (सांगली), अर्चना दयानंद सरवदे (सांगली), छाया गौतम वर्धन (कोल्हापूर)

तर माता रमाई आदर्श माता पुरस्कार विजेत्या श्रीम. आशा एकनाथ फापाळे (मुंबई), अरुणा मेश्राम (यवतमाळ), कांचन गौतम सावंत (सातारा), मधुरा विकास तांबे (सिंधुदुर्ग), मंजुषा नितीन कलशेट्टी (सोलापूर), संगिता शिवाजी पाटील (सोलापूर), माधुरी उमेश तायडे (रत्नागिरी), सुनंदा दिनकर जगदीश (कोल्हापूर), प्रज्ञा वाघोदे(रत्नागिरी) आदी महिलांचा सन्मान सोहळ्यात सहभाग होता. यावेळी

श्री.किरण मानकर, राज्य कार्याध्यक्ष यवतमाळ, 

श्री.तुषार अत्राम, जिल्हाध्यक्ष जिल्हा यवतमाळ ,

श्री.बाळकृष्ण भंडारे ,जिल्हाध्यक्ष सातारा ,

श्री.संजय खरात विभागीय कार्याध्यक्ष सातारा ,

श्री.श्रीशैल कोरे जिल्हाध्यक्ष सोलापूर ,

श्री.सोमलिंग कोळी जिल्हा सरचिटणीस ,

श्री.गौतम वर्धन ,जिल्हाध्यक्ष सोलापूर ,

श्री.संजय कुर्डूकर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर ,

श्री.पी डी सरदेसाई राज्य कार्यकारिणी सदस्य ,

श्री.प्रदीप वाघोदे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी ,

श्री. राजेंद्र वाघमारे अतिरिक्त सरचिटणीस , राज्य ,

श्री. बी जी शिंगणकर, जिल्हाध्यक्ष रायगड , महाड ,

श्री. प्रमोद काकडे जिल्हाध्यक्ष, सांगली ,

श्री.प्रशांत मोरे विभागीय अध्यक्ष ,पुणे ,

श्री. बाजीराव प्रज्ञावंत, वरिष्ठ उपाध्यक्ष राज्य आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार आणि समारोप प्रज्ञा वाघोदे यांनी केले. या महिला अधिवेशनाला राज्यभरातून बहुसंख्य महिला स्त्री शिक्षिका, कार्यकर्ते, राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि महाड क्रांतीभूमीतील स्थानिक बहुसंख्य महिला उपस्थित होत्या . कार्यक्रमानंतर राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस्थळाला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावर समाधीस्थळाला अभिवादन करण्यात आले.