कर्नाटकमध्ये काँग्रेसने विनामूल्य वीज देण्याच्या दिलेल्या आश्वासनाचा दुष्परिणाम!
२३ मे वार्ता (कर्नाटक): – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने विनामूल्य वीज देण्याची घोषणा केली होती. आता काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्यात काही ठिकाणी नागरिकांकडून विजेचे देयक भरण्यास नकार दिला जात असल्याचे समोर येत आहे. राज्यातील चामराजनगर, उडुपी, रायचूर, कलबुर्गी आदी ठिकाणी लोक ‘वीज देयक भरू नका’, असे एकमेकांना सांगत आहेत. काही ठिकाणी वीज देयके वाटणार्या कर्मचार्यांना नागरिक ‘आम्ही देयक भरणार नाही’, असे सांगत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.
१. चामराजनगर जिल्ह्यातील यळंदूर तालुक्यातील होन्नूर गावात वीज देयक वाटण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना परत पाठवण्यात आले. ‘काँग्रेस सरकारने विनामूल्य वीज देण्याचे आश्वासन तातडीने पूर्ण करावे’, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
२. कलबुर्गी शहरातील तारफौल भागातील नागरिक देयक वाटणार्या कर्मचार्यांना ‘तुम्ही आमच्याकडे का आला आहात? आम्ही वीज देयक भरणार नाही’, असे सांगतांना दिसत आहेत. यामुळे काही ठिकाणी वादही झाले आहेत.
३. उडुपीचे सामाजिक कार्यकर्ते वासुदेव भट यांनी त्यांच्या वीज मीटरच्या बोर्डावर ‘जूनपासून वीज देयक भरू नका’ असा संदेश देणारे पत्रक चिकटवले आहे. ‘काँग्रेसने घोषित केलेल्या २०० युनिट विनामूल्य वीज योजनेस मी पात्र आहे. त्यामुळे मी जूनपासून वीज देयक भरणार नाही’, असा दावा त्यांनी केला.