सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा विधायक उपक्रम.!
सावंतवाडी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सावंतवाडी शहरात येऊन दिवसभर उन्हातानात बसून केळी, भाज्या, नारळ आदी वस्तू विकून प्रामाणिकपणे व कष्टाने आपल्या कुटुंबाचा आधार बनून, अत्यंत कष्टाने झटणाऱ्या वयोवृद्ध ज्येष्ठ महिला सुंदरा विश्राम नाईक (राहणार – माडखोल) यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना हार घालून तसेच श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ महिला पत्रकार मंगल कामत, प्रा. रूपेश पाटील, मंगल नाईक – जोशी, शिक्षक दशरथ बोरसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार म्हणाले की, समाजात अशा कष्टकरी महिला भगिनींचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. अशा सत्काराने त्यांना प्रेरणा मिळते. यातून जगण्यासाठी त्यांना प्रचंड ऊर्जा प्राप्त होते, असेही श्री. पवार म्हणाले.