ठाणे: येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टच्या रात्री ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर राजकीय वातावरण तापले असतांनाच मागील २४ घंट्यांत १८ जणांचा मृत्यू झाला, तर १४ ऑगस्टला आणखी ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यात एका १ मासाच्या बाळाचाही समावेश आहे, तसेच एका रुग्णावर उपचार चालू होते, तर एका रुग्णावर अतीदक्षता विभागात उपचार चालू होते, तर एक रुग्ण मृत अवस्थेत आणण्यात आला होता, अशी माहिती आधुनिक वैद्यांनी दिली आहे. या मृत्यूप्रकरणी समितीची स्थापना करण्यात आली असून २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा समितीला आदेश देण्यात आला आहे.
१४ ऑगस्टला मनसेच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांच्या हाती कळवा रुग्णालयाच्या दुरावस्थेची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘आरोग्यव्यवस्था सक्षम करा’, अशी घोषणा दिली. ‘आयुक्तांनी समस्त ठाणेकरांची क्षमा मागावी, रोषणाई नको मोफत उपचार द्यावेत’, अशी मागणीही या वेळी मनसेचे उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी केली.