सावंतवाडी प्रतिनिधी:
कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव श्री.चंद्रकांत राणे, कलंबिस्त सरपंच श्रीम. सपना सावंत,उपसरपंच श्री. सुरेश पास्ते, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.गजानन पास्ते,पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री.सुभाष राऊळ,माजी शिक्षकेतर कर्मचारी श्री.रामचंद्र सावंत, मुख्याध्यापक श्री.अभिजीत जाधव, पालक श्रीम. सिमरन राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच इ.५वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रशालेचे माजी विद्यार्थी तसेच मळगाव इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री.विठ्ठल रामचंद्र सावंत यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्यांचे वितरण त्यांचे वडील श्री. रामचंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी ते करत असलेल्या या मदतीबद्दल त्यांचे संस्था व शाखेमार्फत आभार व्यक्त करण्यात आले.या प्रवेशोत्स्वाच्या निमित्ताने श्री. चंद्रकांत राणे, श्री.सुभाष राऊळ, मुख्याध्यापक श्री. अभिजीत जाधव आदींनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किशोर वालावलकर तर आभारप्रदर्शन श्री.विलास चव्हाण यांनी केले.