सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या चेअरमन पदी ॲड संतोष सावंत तर व्हाईस चेअरमन माझी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कलंबिस्त पंचक्रोशी त शेतकऱ्यांच्या हितासाठी पहिली दुग्ध संस्था स्थापन करण्यात आली. या दुग्ध संस्थेचा विस्तार आज वाढला आहे. या दुग्ध संस्थेची चेअरमन पदाची निवडणूक शनिवारी सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजन राणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सर्वानुमते विद्यमान चेअरमनॲड संतोष सावंत व व्हाईस चेअरमन रमेश सावंत यांची फेरनिवड करावी असा ठराव घेण्यात आला. एकमताने ही निवड जाहीर करण्यात आली. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीत दुग्ध व्यवसायाला गती देऊन पुढील काळात हा भाग पर्यटन दृष्ट्या विकसित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी व पशुसंवर्धन मध्ये तरुणांना प्रोत्साहित करून प्रत्येक घरात एक गाई, म्हशी पालन उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेचा आहे. या पंचक्रोशीत दुग्ध विकासाच्या दृष्टीने वाव असून या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने सिंधू रत्ना योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मेंढीपालन आधी योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. ही पंचक्रोशी पुढील काळात दुग्धविकासामध्ये धवल क्रांती कशी करेल. या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून गाई, म्हशी खरेदी अभियान राबवण्यात येईल. ही संस्था गावातील दुग्ध शेतकरी सदस्यांच्या सहकार्यामुळे lउभी आहे. दुग्ध शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यात येतील. असे चेअरमन एडवोकेट सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजन राणे यांनी कलंबिस्त पंचक्रोशीत ही दुग्ध संस्था निश्चितपणे शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने चांगले काम करत आहे. यापुढेही त्यांनी चांगले काम करावे. अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष रमेश सावंत यांनी ही संस्था अनेक चढ उतार अनुभवत आज कार्यरत आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम केले जाईल. असे ते म्हणाले. यावेळी संचालक आनंद बिडये, लक्ष्मण राऊळ, प्रकाश तावडे, दत्ताराम कदम, महादेव गावडे, अमिता तावडे, सुचिता तावडे, दशरथ पास्ते, राजन घाडी, लहू राऊळ, महादेव तावडे, जानू पास्ते, श्रीमती पास्ते, बाळू पवार, सिद्धेश सावंत, माजी उपसरपंच रेश्मा सावंत आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजन राणे यांचे स्वागत करण्यात आले व नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक यांचे अभिनंदन करण्यात आले.