सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवर सरपंच निवडणुकीपूर्वी त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना निवडणुकीनंतर मात्र लगेचच तो महागड्या गाडीत कसा काय फिरतो? असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल, त्या प्रश्नाचे उत्तर बुलढाणा- जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात जलंब ग्रामपंचायत आहे. जलंब येथील मंगला घोपे नामक महिला सरपंचाने जलंब ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात कोट्यवधी रुपयाची विकास कामे केली.ही विकास कामे करत असताना ठेकेदारांकडून कमिशन पोटी या महिला सरपंचाला तब्बल 22 लाख रुपये मिळालेत. मात्र, या महिला सरपंचाने कमिशन पोटी मिळालेल्या या रकमेतून स्वतःचे घर न भरता संपूर्ण पैसा गावाच्या विकासासाठीच खर्च केला. त्याचा लेखाजोखा अत्यंत पारदर्शकपणे स्वतःकडे मांडून ठेवला. एवढेच काय तर हा लेखाजोखा गावात बॅनरच्या माध्यमातून प्रसिद्ध देखील केला आहे.या अफलातून कामगिरीमुळे या सरपंचाची चर्चा जिल्हाभर होऊ लागली आहे.गावाच्या विकासासाठी वित्त आयोगाच्या माध्यमातून थेट निधी सरपंचाच्या बँक खात्यावर येऊ लागला. त्यामुळे बिले काढण्यासाठी होणारी लाचखोरी काही अंशी कमी झाली. मात्र, आता सरपंचालाच लाच देऊन गावात काम मिळवणाऱ्यांची संख्या कमी नाही.
अनेकदा काम घेणारे ठेकेदार कमिशन पोटी सरपंचांना लाखो रुपये देत असतात आणि हे संपूर्ण लाखो रुपये ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदावर बसलेले सरपंच गडप करून स्वतःची घरे भरतात. बुलढाणा जिल्ह्यात जलंब गावातील या महिला सरपंचाने ग्रामपंचायतीमध्ये चालणारा हा गोरखधंदा चव्हाट्यावर आणला आहे. या संपूर्ण प्रकाराने अनेकांकडून या महिला सरपंचाचे गोड कौतुक केल्या जात आहे. मात्र भ्रष्ट यंत्रणा उभारणाऱ्या ठेकेदारांवर आणि भ्रष्टाचाराची काळी माया जमा करणाऱ्या इतर सरपंचावर सरकार मायबाप कुठवर मेहेरबान राहणार? असा उपरोधक सवालही सर्वसामान्य या निमित्ताने विचारू लागला आहे.