कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे असलेल्या वळणावर वारंवार होणार्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पुढील १५ दिवसांत याविषयी निर्णय घ्या. या ठिकाणी आवश्यक ते ‘रंबलर’ (अत्यंत अल्प उंचीच्या आणि रुंदीच्या अनेक गतीरोधकांची साखळी) किंवा अल्प उंचीचे गतीरोधक बसवा, अन्यथा १५ दिवसांनंतर महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी दिली आहे. महामार्गावरील हळवल फाट्यावर अपघातांची शृंखला चालूच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर तहसीलदार देशपांडे यांना निवेदन देण्यात आले.
येथे सातत्याने होणारे अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी उपाययोजना करावी; म्हणून काही समाजसेवी लोकांनी हळवल फाट्यावर आंदोलन केले; मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात येत नाही. या आठवड्यात येथे १ कंटेनर उलटला. त्याला बाजूला केल्यानंतर दुसरा टँकर उलटला. ही होणारी हानी कशी भरून काढणार ? ही अपघातांची मालिका अशीच चालू रहाणार आहे. हे रोखण्यासाठी प्रशासन निर्णय घेणार कि नाही ? लोकांनी प्रक्षोभक आणि विघातक आंदोलने केली, सरकारी मालमत्तेची हानी केली, तरच या प्रश्नाला न्याय मिळणार आहे का ? असा संतप्त प्रश्न या निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे.