Home स्टोरी औरंगजेबच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा! अंबादास दानवे

औरंगजेबच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा! अंबादास दानवे

170

१० जून वार्ता: कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे फोटो स्टेटस ठेवण्यावरून हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. यावरूनच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “औरंगजेबचा भाजपाला एवढाच तिटकारा असेल तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा,” असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, “मुगल बादशाह औरंगजेब व टिपू सुलतान यांचे फोटो झळकावणे व व्हाट्सअप स्टेटस ठेवण्यावरून राजकारण सुरू असताना औरंगजेबाचे भूत सत्ताधारीच बाहेर काढत आहेत. तर औरंगजेबचा भारतीय जनता पक्षाला एवढाच तिटकारा असेल तर त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीला असलेल्या संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा. तसेच आपल्या ट्विटरवरून दानवे यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले आहे की, “‘बाटलीतून भूत’ बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की, पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे. याकडे ‘पार्टी विथ डिफरन्स’ जाणीवपूर्वक नजरेआड करत आहे. मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते, हे विसरू नका. हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा, असेही दानवे म्हणाले.