ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत दादर पूर्व फिरदोशी रोड येथील सोहरब पालमकोट हॉल ट्रस्ट येथे होत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मुंबईचे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सकाळी १० वाजता मराठी अभंग व भावगीतांचा ‘स्वर संध्या’ हा सुरेल नजराणा प्रसिद्ध गायिका संध्या केळकर – बर्वे सादर करणार असून त्यांना संगित साथ निनाद चिले (तबला), निहार बाईत (संवादिनी), हेमंत मेस्त्री (पखवाज) यांची आहे. सकाळी ११:३० वाजता मान्यवरांच्याहस्ते रौप्य महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन, त्यानंतर मंडळाच्या रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता तिमीरातुन तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते तथा मुंबई सीमा शुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे शासकीय स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन, दुपारी २:३० वाजता मुंबईस्थित ओटवणे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सायंकाळी ३ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम, सायंकाळी ३:३० वाजता महिला व मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आदी कार्यक्रम होणार आहेत.