मसुरे प्रतिनिधी: मार्च २०२३ च्या शालान्त परीक्षेमध्ये (दहावी) ओझर विद्या मंदिर कांदळगाव प्रशालेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी प्रशालेमधून एकूण २१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन, श्रेयस संतोष गावकर हा ७७% गुण मिळवून प्रथम, निष्ठा चंद्रशेखर कांबळी ७५.४०% गुण मिळवून द्वितीय तर हिमेश अनिल लाड हा ७४.६०% गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सर्व संस्था संचालक, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
यापुढे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेच्या सर्व घटकांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ओझर विद्या मंदिरचे विद्यार्थी विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा आणि शालान्त परीक्षेमध्ये यश मिळवीत असल्याबद्दल पंचक्रोशीतील पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.