मसुरे प्रतिनिधी: कोकणवासियांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता लगतची झाडी तोडणे व साफसफाई करणे, व रस्ता खड्डे भरणे कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे रस्ता, चौके आंबडोस माळगाव मसुरे रस्ता, मालवण कसाल रस्ता या रस्त्यांलगतची साइडपट्टी वरील झाडी तोडून तसेच रस्त्यास पडलेले खड्डे भरून रस्ते वाहतुकीस सुस्थितीत करण्याच्या कामाचा प्रारंभ झाला असून बहूतांश काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उप अभियंता अजित पाटील, शाखा अभियंता तुषार येरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम पूर्ण झाले आहे. ग्रामस्थांसह वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे यासाठी आभार मानले आहेत.