”होळी होळी, पुरणाची पोळी, त्यावर साजूक धार…! शिमग्याच्या धुळवडीत निवडणुकीचा बार !!”
भारतातील भौगोलिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, भाषिक, वांशिक, इ. अनेकविध क्षेत्रातील विविधता लक्षात घेऊन अखंड एकोपा साधण्याचा केंद्रबिंदू म्हणजे संसद असते. देशाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींची सुत्रे थेट या वास्तूपाशीच जोडली जातात. देशाशी संबंधित सर्व धोरणे, निर्णय, योजनांचे हे उगमस्थान असते. यासाठीच कानाकोपऱ्यातील नागरिक अमूल्य मत देऊन आपला प्रतिनिधी येथे पाठवीत असतो. अर्थात, लोकसभा व राज्यसभा अशी दोन गृहे असणाऱ्या संसदेत लोकसभेमध्ये थेट लोकनियुक्त प्रतिनिधी असतात. प्रत्येक पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. निवडणुकीचे रंग ‘उधळण्या’ वर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. योगायोग म्हणजे होळीशी संबंधित ‘धुळवड’, ’शिमगा’, ‘धुमशान’, ‘सोंगे’ या शब्दांचा हमखास निवडणूक प्रचारात वापर होणारी दस्तुरखुद्द् होळी तर याच काळात आहे !
कुणी कितीही नाकारले तरीही राजकारणाच्या बातम्यांचा वास हवाच असतो. कोकणातील माणसाच्या पोटात माशाच्या कालवणाच्या वासानेही जास्तीचा भात जातो. कालवणात मासे नाहीत म्हणून नाक मुरडतील, पण ते कालवणच खातील. तसेच हे आहे. ‘नको रे बाबा राजकारण’ म्हणतील.. लटकेच नाक मुरडल्यासारखे करतील, पण बातम्या जिज्ञासेनेच वाचतील ! नाहीतरी कोकणी माणूस कसा आहे, हे सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी सांगितलेलेच आहे, नाही का ?
असो, तर या निवडणुकीच्या रणधुमाळीचा शुभारंभ ऐन होळीच्या दिवसातच होत आहे. येत्या १९ एप्रिलपासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होणार असून ती १ जूनपर्यंत चालणार आहे. एकूण पाच टप्प्यात होणारी ही निवडणूक रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा एक लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात रत्नागिरी व सिंधुदुर्गातील प्रत्येकी ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. सिंधुदुर्गात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी असे ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. तर या मतदारसंघातील खासदार निवडीसाठी आता अधिकृत प्रचार सुरू झालाच आहे.
पंधराव्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून निलेश राणे राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडून आले होते. सोळाव्या व सतराव्या लोकसभेवर विनायक राऊत शिवसेनेकडून निवडून गेले. आता अठराव्या लोकसभेत खासदारपदी कोण ‘मिरवणार’ , याचे कुतूहल वर म्हटल्याप्रमाणे सर्वांनाच आहे. उमेदवारांमधील रस्सीखेच येत्या काहीच दिवसात दिसेल. तर ऐन शिमगोत्सवातील निवडणुकांची रणधुमाळी रसिकांना मनोरंजन, गप्पीष्टांना खुमासदार विषय, हॉटेलमधील चहा-भजीसाठी निमित्त, शिमग्यातील सोंगांसाठी चिरीमिरी असे खूप काही देणार आहे. तसेही निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच आधीच्या काही जवळच्या दिवसात अनेक गावामंध्ये विकासकामांची लगबग दिसू लागली आहे. त्यामुळे तसाही आनंदीआनंदच !
निवडणुका म्हणजे तसाही एक सार्वजनिक उत्सवच असतो, म्हणायला हरकत नाही. सर्वसामान्य माणसाच्या मनात कोणत्या ना कोणत्या पक्षाविषयी आस्था ही असते. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यावर आपोआपच वेगळेच वातावरण तयार होते. आपल्या पक्षाचा उमेदवार कोण असेल, हे जाणून घेण्याची ओढ असते. फक्त खुलेपणाने कोणी व्यक्त होत नाही, एवढेच ! नेत्यांची भाषणे आवडीने ऐकणारे आपल्याकडे कमी नाहीत. त्यांचे आवडलेले मुद्दे समाजमाध्यमांवर गरागरा फिरवणारी माणसे आपल्यातीलच तर असतात. आपल्या आवडत्या नेत्याला मोठी करणारी माणसे, नेत्याच्या सभांना तासनतास ताटकळण्याचा संयम दाखविणारी माणसे, नेत्यामागे बेभानपणे धावणारी माणसे आपल्यापैकीच तर असतात.
परिस्थिती बदलली…!
आताशा परिस्थिती फार बदलली आहे. मागील काही वर्षांपूर्वीची स्थिती काहीशी वेगळी होती. त्यावेळी या क्षेत्रात कधी आकस दिसत नव्हता. एकमेकांमध्ये हाडवैर दिसत नव्हते. बघायला गेले तर, प्रत्येक पक्षाची निश्चित अशी विचारधारा असते. वेगवेगळ्या पक्षांमधील विचारधारेमध्ये फरक असतो. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणे साहजिकच असते. ते पूर्वीही व्हायचे; परंतु ते बेलगाम, बेछूट नसत. त्या आरोप-प्रत्यारोपांना अभ्यासाची झालर होती. मुळात वापरल्या जाणाऱ्या भाषेतून, शब्दातून सुसंस्कृतपणा दिसायचा. अलिकडे आरोप करताना नेतेमंडळींच्या जिभा घसरु लागल्या आहेत. (अपवाद असतीलही! ) एकमेकांना चप्पल दाखविण्यापर्यंत मजल जाऊ लागली आहे. एकमेकांच्या घरची उणीदुणीही निघू लागली आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारण हेच का असा प्रश्न पडू लागला आहे. अनेक जुनीजाणती मंडळी या बदलत्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करतात. ते म्हणतात , ”पूर्वी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आम्ही तरुण मुले आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी आमच्या वाड्या ‘पॅक’ करायचो. रात्री जागवायचो. हातात कंदील घेऊन गावाच्या वेशींवर पहारा ठेवायचो. आमच्याकडे वाहने नव्हती. दुसऱ्या दिवशी आपापल्या पक्षांचे बुथ मजबूत कसे राहतील हे पहायचो. आपला उमेदवार निवडला तर मिरवणुकीत बेभान नाचायचो. ‘पडला’ तर सगळे त्याच्या घरी जाऊन त्याला दिलासा द्यायचो. दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या गळ्यात हात घालून फिरायचो. ”अर्थात, निवडणुकांकडे ही माणसे खेळ म्हणून पाहत. निवडणुका म्हणजे उत्साह असायचा. त्या माध्यमातून माणसे एकत्र येत. विरोधकांच्या गोटातील बारीकसारीक गोष्टी दिवसभरात जाणून घेत, आणि रात्री एकत्र जमून एकेकजण त्यांच्याकडील पुरचुंडी सोडून गप्पांचा आनंद घेत. मोठमोठ्या बढाया मारत. कोऱ्या चहाच्या पाण्यावर रात्री-रात्री जागवत. या माणसांना मतासाठी पैसे मिळतात, हेही ठावूक नव्हते ! गावात कामे करणाऱ्या नेत्याला प्राधान्य दिले जायचे. आज डिजिटल काळात चित्रच बदलले आहे. आजकालच्या मुलांना पूर्वीच्या निवडणुकांचा आनंद कळणारच नाही. आज निवडणुकांमधील विजय म्हणजे अस्मितेचा प्रश्न होतो. राजकारणाकडे खिलाडू वृत्तीने पाहिले जात नाही. एकमेकांविषयी मनात आकस बाळगून स्वैर विधाने केली जातात. एकमेकांची मने दुखावतात. त्यामुळे निवडणुकीच्या वेळचा निखळ आनंद मिळत नाही.
निवडणूक आयोगाकडून निवडणुका पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. खरोखरच निवडणुका नि:पक्षपातीपणे पारदर्शक व्हायला हव्यात. पूर्वीच्या नेत्यांमधील खिलाडू वृत्तीचे दर्शन घडायला हवे. पूर्वीच्या नेतेमंडळींची टीका सुसंस्कृत व अभ्यासू होती. जुनी ‘वैनतेय’ सारखी साप्ताहिके चाळली की त्या टीकेचे तसेच सत्तेतील पक्षाच्या बाजुचेही अभ्यासू स्वरुप दिसून येते. शासनाच्या एखाद्या निर्णयावर टीका करतानाही नेतेमंडळी विचार व चिंतन करीत. आपला मुद्दा चिकित्सक वृत्तीने पटवून देत. सरकारवर ताशेरे ओढतानाही आपली लेखणी किंवा जीभ घसरु देत नसत. त्यांच्या लेखनातून साहित्यिक शैली डोकावताना दिसते. अशा साप्ताहिकांमधील नेत्यांचे लेख वाचले की हे आपले नेते होते, याचा अभिमान वाटतो.
ग्रामीण भागात सणच..!
काही वर्षांपूवी गावात करमणुकीची साधने पोहोचली नव्हती. असली तरी विरळच. त्यामुळे माणसे निवडणुकीच्या धामधुमीत स्वत:चे पुरते मनोरंजन करुन घेत. ग्रामीण भागात खरोखरच ‘शिमगा’ असायचा. हातात लाठ्याकाठ्या आणि कंदील नाहीतर करवंटीत मेणबत्त्या लाऊन त्या उजेडात माणसे बाहेर पडत. वेशीपर्यंतच्या येरझारा संपल्या की कुठेतरी एकत्र बसून आसपासचा मागोवा घेत. कोणत्याही दुसऱ्या नेत्याला किंवा त्याच्या माणसांना गावात घेत नसत. निवडणूक म्हणजे एक जाती-धर्मापलिकडे गेलेला सार्वजनिक सणच असायचा. सर्वजण मिळून एकोप्याने, खिलाडू वृत्तीने तो साजरा करायचे. तेच बरोबर होते.
शिमगा आणि निवडणूक..!
आता शिमगा तर ऐन उंबरठ्यावरच आहे. त्यात लोकसभेची निवडणूक आहे. म्हणजे एक धार्मिक आणि दुसरा सार्वजनिक असे दोन्ही सण एकाचवेळी आहेत. अर्थातच होळीचा रंग निवडणुकीस लागून ती अधिकच रंगणार. ढोलावरील काठीने निवडणूकही लय धरणार. निवडणुकीकडे खिलाडू वृत्तीने पाहणारी मंडळी स्वत:ची करमणूक करुन घेतील. ‘व्हॉटसॲप’ वीर छान-छान मजेशीर ‘पोस्ट’, ‘स्टेटस’ तयार करतील. आमच्यासारख्या वाचकांचे मनोरंजन करतील. आवडत्या ‘साहेबां’ची तळी उचलतील, नावडत्या ‘साहेबां’ना खाली बसवतील. या सगळ्यात मतदार त्यांची-त्यांची भूमिका निभावतील.
आमची भूमिका शुभेच्छांची. त्या तर आहेतच प्रत्येकाच्या पाठीशी !!
लेखिका: सौ. मंगल नाईक -जोशी