सावंतवाडी प्रतिनिधी: काल रात्री सातच्या सुमारास सावंतवाडी आरोग्य भुवनच्या मागे एक वृद्ध व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला याची कल्पना सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना मिळताच रवी जाधव व अशोक पेडणेकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लगेचच सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला असता घटनास्थळी ए एस आय पोलीस अधिकारी जगदीश दूधवाडकर दाखल झाले. सदर वृद्धाची अवस्था फार गंभीर होती सारख्या उलट्या करत होता तापानेही फडफडत होता व कपड्यांमध्ये पूर्णपणे घाण करून ठेवल्यामुळे दुर्गंधी पसरली होती परंतु याची तमा न वळता खाकी वर्दीतील त्या पोलीस अधिकाऱ्याने देवदुताचे दर्शन घडवले व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांबरोबर सदर घाणीमध्ये लडबडलेल्या त्या वृद्धाला आंघोळ घालण्यास मदत केली.
आंघोळ घालून स्वच्छ केल्यानंतर सामाजिक बांधिलकीचे अशोक पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते अखिलेश कोरगावकर यांनी त्या वृद्धासाठी नवीन कपडे आणून घातले. तर शहरातील माजी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी विनामूल्य ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली व त्या ॲम्बुलन्सने सदर वृद्धरुग्णाला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर त्या वृद्धाच्या नातविकांचा शोध घेऊन त्या वृद्धाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळा कुडतरकर व आरोग्य भवन चे मालक यांचे सहकार्य लाभले.