मसुरे डांगमोडे गावच्या आदित्य ठाकूर यांना बेस्ट पेपर एवार्ड…
मसुरे प्रतिनिधी:
एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेजच्या तृतीय वर्ष एमबीबीएस ला असणाऱ्या आणि मसुरे डांगमोडे गावचा सुपुत्र असलेल्या आदित्य ठाकूर यांनी महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे ऑर्थोपेडिक रुग्णासंबंधी सादर केलेल्या पेपरला महाराष्ट्रात बेस्ट पेपर अवॉर्ड म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आदित्य ठाकूर या विद्यार्थ्याला प्रोफेसर म्हणून डॉक्टर आर एस कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य केले. मेडिकल कॉलेजचे संस्थापक केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकूर यांचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या कालावधीत रुग्णांच्या फ्रॅक्चर होण्याचे कारण काय आहे याचे संशोधन करण्यात आले. या संबंधी काही ऑपरेशनही करण्यात आली. त्यातून ज्या गोष्टी समोर आल्या त्यातून पाय हात फॅक्चर झाल्यावर ते कसे सांधता येतात यावर अभ्यास करून त्यासंबंधीचा पेपर महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज औरंगाबादला सादर करण्यात आला. सर्व राज्यातून समितीसमोर पेपर पाठवण्यात येतात. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांमधून पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आणि मसुरे डांगमोडे गावचा सुपुत्र असलेल्या आदित्य ठाकूर याला बेस्ट अवॉर्ड मिळाल्याबद्दल आदित्यचे मार्गदर्शक डॉक्टर आर एस कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान आदित्य ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता पडवे येथे केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेज निर्माण केल्याने मालवण मसुरे गावच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला डॉक्टर होण्याची संधी मिळू शकली. माझे आई-वडील आणि माझा परिवार आणि या पेपर साठी मला नेहमीच मार्गदर्शन करणारे प्रोत्साहन देणाऱ्या डॉक्टर आर एस कुलकर्णी यांचे आभार व्यक्त करताना मेडिकल कॉलेजमुळे हे सर्व शक्य झाल्याचे आदित्य ठाकूर यांनी सांगितले. यापुढे सुद्धा एस एस पी एम मेडिकल कॉलेज चे नाव विविध क्षेत्रांमध्ये पुढे आणण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही बोलताना त्यांनी सांगितले.