२३ मे वार्ता: सध्या अवकाळी तसेच पिकांवरील रोग अशा दुष्टचक्राला बळिराजा तोंड देत पुढे जातोय. हे दुष्टचक्र थांबण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाची गरज असून, एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आहे. याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होतोय, ही निश्चितच बदलाची नांदी आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी राज्य शासन नक्कीच पुढाकार घेईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नेरळ येथील सगुणा बाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवादात सोमवारी ते बोलत होते. यावेळी ५२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
अनिल निवळकर यांची संकल्पना आणि राकेश देवरुखकर यांनी काढलेल्या भूमातेच्या चित्राचे मुख्यमंत्री व विशेष पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच सगुणा फाउंडेशन डॉट एनजीओ या संकेतस्थळाचे प्रतीकात्मक उदघाटन करण्यात आले. यावेळी कृषिभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी एसआरटीचे महत्त्व विशद केले.