२३ जून वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमधील कंपन्यांनी विविध करार केले आहेत. यानुसार, अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक एअरोस्पेस कंपनीने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर ‘एफ४१४’ इंजिनची सहनिर्मिती करण्याबाबतचा सामंजस्य करार केला आहे. या करारावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भेटीदरम्यान शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, संयुक्त अवकाश मोहिमेसाठीही ‘नासा‘ आणि ‘इस्रो‘दरम्यान करार झाला आहे. जनरल इलेक्ट्रिक आणि ‘एचएएल’ यांच्यातील करारानुसार, भारतीय लष्कराच्या गरजेनुसार लढाऊ विमानांसाठी अत्यंत उच्च दर्जाची इंजिनची सहनिर्मिती केली जाणार आहे. ‘एफ४१४‘ हे अत्यंत उच्च क्षमतेचे इंजिन असून दोन्ही देशांच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेत यामुळे मोलाची भर पडेल, असे ‘जीई’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या इंजिनचा वापर भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाई विमानांमध्ये केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.