मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एन्.एम्.एम्.टी. च्या) कायम कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना एन्.एम्.एम्.टी. प्रशासनाने वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मान्यतेने ही योजना लागू करण्यात आल्याची माहिती उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी दिली. या विमा योजनेचा शेकडो कर्मचार्यांना लाभ झाल्याने त्यांचा याला वाढता प्रतिसाद आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची स्थापना वर्ष १९९६ मध्ये झाली; मात्र उपक्रमाला २३ वर्षे होऊनही येथे कार्यरत असलेल्या कायम तसेच ठोक मानधनावरील कर्मचार्यांना वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली नव्हती. सद्यस्थितीत चालक, वाहक, तांत्रिक आणि मदतनीस या संवर्गामध्ये एकूण १ सहस्र ४०९ कर्मचारी ठोक मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत. परिवहन उपक्रम अत्यावश्यक सेवा असून परिवहन उपक्रमातील कामाचे स्वरूप शारीरिक श्रमाचे आणि धकाधकीचे असल्याने कर्मचार्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. शारीरिक आजारपणामुळे कर्मचार्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण असते. त्याचा परिणाम दैनंदिन बस संचलनावर होत असतो. परिणामी प्रवाशांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नाही आणि परिवहन उपक्रमाचीही आर्थिक हानी होते. उपक्रमातील कामगारांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी उपक्रमात कार्यरत असलेल्या कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधी हे कामगारांसाठी वैद्यकीय विमा योजना लागू करण्याची मागणी वर्ष २०१८ पासून वारंवार मागणी करत होते. याला परिवहन उपक्रमाने सकारात्मक प्रतिसाद देत मागील वर्षी प्रथम ठोक मानधनावरील कर्मचार्यांना ही योजना लागू केली. त्यानंतर या वर्षापासून ९४७ कायमस्वरूपी कर्मचार्यांनाही ही योजना लागू केली आहे.‘न्यू इंडिया इन्सुरन्स आस्थापना’ला हे काम देण्यात आले आहे. यासाठी उपक्रमाने एकूण ४ कोटी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. २०२२ मध्ये उपक्रमाने विम्यासाठी ७६ लाख रुपये भरले. त्या बदल्यात आस्थापनाने ठोक मानधनावरील ७०० कर्मचार्यांना ७८ लाख रुपये विमा संमत केला. यामध्ये हृदयविकारासह मोतिबिंदू आणि सर्व जुन्या आजारांचा समावेश आहे. ठोक मानधनावरील प्रति कर्मचारी ३ लाख रुपये, तसेच कायम कर्मचार्यांना ५ लाख रुपयांचे विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘परिवहन उपक्रमाने उपलब्ध करून दिलेल्या या वैद्यकीय विमा योजनेमुळे अनेक कर्मचार्यांचे कर्जाच्या खाईत जाणारे संसार वाचले आहेत’, अशी प्रतिक्रिया वाहक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.