Home क्राईम एका पोलिसाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण!

एका पोलिसाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण!

198

मुंबई : राज्यातील नागरिकांचे रक्षण करणे हे पोलीस प्रशासनाचे काम आहे. मात्र आता रक्षकच भक्षक बनले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका पोलिसाने भलताच प्रताप केला आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. पोलीस प्रशिक्षण क्लास चालवणाऱ्या पोलिसाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पीडित मुलींनी दिलेल्या जबाबानंतर ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. यातील धक्कादायक म्हणजे या आरोपी पोलीस प्रशिक्षकासोबतच त्याच्या पोलीस मैत्रिण अनुजा शिगाडेवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. समाधान गावडे (वय वर्ष २८) नावाचा आरोपी पोलीस प्रशिक्षक हा नालासोपाऱ्यात ‘विजयी भव’ नावाचे पोलीस प्रशिक्षणाचे क्लास चालवायचा. त्याच्या ‘विजयी भव’क्लासमध्ये अनेक मुली प्रशिक्षणासाठी येत होत्या. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन गावडेकडून प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना अश्लील मॅसेज पाठविण्यात येत होते. अनेकदा गावडे मुलींना व्हिडीओ कॉल करून त्यांच्यासोबत अश्लील कृत्यसुद्धा करत होता. दरम्यान शिकविण्याच्या नावाखाली आरोपी हा मुलींच्या अंगाला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत असे. तसेच अनेकदा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जात असे. काही वेळा त्यांना फिरायला बोलवत असे. परंतु, त्याच्या या सर्व कृत्यांना वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली त्याची २५ वर्षीय मैत्रीण अनुजा पाठिंबा देत होती. अनुजाने एका पीडित मुलीचे व्हॉट्सॲप स्कॅन करून गावडेबरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. ज्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने क्लासेसमध्ये जाणेच बंद केले होते. शेवटी गावडेकडून होणाऱ्या या संतापजनक कृत्याला कंटाळून पीडित मुलींनी अलीकडे नालासोपारा पोलीस ठाण्यात गावडे आणि अनुजा या दोघांविरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपींना काल न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.