सहाय्यक पोलीस निरीक्षक बडवे यांना सादर केले निवेदन.
बांदा प्रतिनिधी:– बांदा येथे महामार्गावर चालू असलेल्या नियोजित उड्डाणपुलाच्या कामाच्या ठीकाणी कंत्राटदाराकडून बेजबाबदार पणे व नियमबाह्य पद्धतीने मनमर्जीने वाहतूक एकमार्गी वळवण्यात येत आहे.ज्यामुळे मागील आठवडाभर महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.मागील आठवड्याभरात सदर ठिकाणी रोज अपघात होत असून ॲम्बुलन्स सारखे अत्यावश्यक सेवा देखील त्यामुळे प्रभावित होत आहे. या सर्व त्रासाला कंटाळत बांदा येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष,मुंबई त्याचप्रमाणे महामार्ग वाहतूक नियंत्रक, सिंधुदुर्ग विभाग यांचेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत सदर विभागाकडून दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सदर वाहतूक नियंत्रकांच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतर सदर ठिकाणी पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली. याकरता पुन्हा एकदा बांदा ग्रामस्थ एकत्र येत बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.बडवे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष व जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्याशी समन्वय राखत याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून श्री.गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर,प्रशांत बांदेकर,सिद्धेश महाजन,आबा धारगळकर,रूपाली शिरसाट, मनोज कल्याणकर,शैलेश केसरकर, उदय येडवे,स्मिता पेडणेकर,साई सावंत व आशिष कल्याणकर हे उपस्थित होते.