सिंधुदुर्ग प्रतिनिधी: वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) या नेटवर्क मार्केटिंग कंपनी मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच लोकांची करोडो रुपयाची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) या कंपनीच्या विरोधात मालवण पोलीस स्टेशनला १२० पेक्षा अधिक लोकांनी तक्रार दिली आहे. वेदिक आयुर केअर या कंपनीमध्ये गुंतवणूक करून पैसे तीन पट होणार अशी माहिती या कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच नागरिकांनी बँकांकडून, बचत गटांकडून आणि प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत. अशी माहिती काही व्यक्तींनी दिली आहे.
गेल्या दीड वर्षापासून वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) चा कारभार काही योग्य पद्धतीने चालत नाही आहे. आणि नागरिकांचे घेतलेले पैसेहि परत मिळत नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तारांबळ उडाली आहे. ई स्टोअर इंडिया कंपनीमधून तीन पट पैसे मिळणं तर दूरच राहिलं पण घातलेली मुद्दल पण मिळत नाही आहे आणि आता ज्या बँकांकडून काही लोकांनी पैसे घेऊन ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये गुंतवले होते त्यांचे आता व्याजही वाढत आहे. आणि प्रायव्हेट फायनान्स कंपनीचे कर्मचारी, बचत गटांचे अधिकारी घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी वारंवार लोकांकडे जात असल्यामुळे लोकांना आता अफाट त्रास सहन करावा लागत आहे.
वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) चे प्रमुख फैजान खान गेल्या एक वर्षापासून भारतातून गायब होऊन दुबईमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीचे पुढे नेमकं काय होणार आहे? पैसे मिळणार की नाही? याबाबत कोणतही चित्र अजून तरी स्पष्ट होत नाही. तसेच ई स्टोअर इंडियाचे प्रमुख ऑनलाईन मीटिंग घेत कित्येक महिने फक्त पैसे मिळण्याची आश्वासनं देत असल्यामुळे कंपनीचे गुंतवणूकदार संताप व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वेदिक आयुर केअर कंपनीमधून काही लोकांनी लाखो, करोडो रुपये कमवलेले आहेत. पण ज्या व्यक्तीने २०२२ मध्ये लाखो रुपये गुंतवणूक केली होती त्या व्यक्तींचे मात्र पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे आणि आपले पैसे परत मिळावे याबाबत मालवण पोलीस स्टेशनला तब्बल १०० हुन अधिक लोकांनी तक्रार नोंदवली आहे. तसेच या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लीडर लोकांनी नागरिकांना या कंपनीमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करण्यासाठी सांगितले आणि स्वतः करोड रुपये कमवल्यानंतर आता वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) कंपनी सोडून ज्या लोकांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करून काम कारण्यासाठी सांगितले होते त्यांच्याशी संपर्क तोडून स्वतः दुसऱ्या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि आपल्या सोबत इतरांनाही पैसे पाहिजे तर नवीन कंपन्यांमध्ये काम करा असं सांगत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) कंपनीच्या प्रमुख लीडर लोकांवर योग्य ती कारवाई करून त्यांना अटक करा आणि आमचे पैसे मिळवून द्या अशी वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. अशी माहिती मिळते. कंपनीच्या प्रमुखांकडून लोकांना नुसती आश्वासने दाखवली जात आहेत. या कंपनीच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या मोहामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी बँकांकडून कर्ज घेऊन या कंपनीमध्ये पैसे गुंतवले त्यामुळे लोकं कर्जबाजारी झाले आहेत. अशीही माहिती मिळत आहे. याबाबत अधिक तपास मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव करत आहेत
मालवण पोलीस स्टेशनला ज्या लोकांनी तक्रार दाखल केलेली आहे त्यापैकी काही व्यक्ती स्वतः वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) या कंपनीचे प्रमुख लीडर म्हणून काम करून लाखो रुपये कमवलेले आहेत. आता स्वतःवर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून इतर तक्रार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होऊन स्वतःचे नुकसान झाल्याची खोटी माहिती देत असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने वेदिक आयुर केअर (ई स्टोअर इंडिया) च्या काही महिला लीडर पुढे आहेत. मालवण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार धारकांमध्ये कित्येक आशा व्यक्ती आहेत ज्या व्यक्तींनी स्वतः लाखो रुपये कमवले आहेत आणि आता स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून इतरांसोबत तक्रार देण्यासाठी पुढे आल्याची माहिती मिळत आहे.
फॅनी फर्नांडिस, धोंडी नेरकर, सिमा लंगोटे (देवागड),या व्यक्ती वेदिक आयुर केअर (ई- स्टोअर इंडिया) या कंपनीच्या प्रमुख लीडरच्या यादीमध्ये होत्या. या व्यक्तींनी इतर लोकांना कंपनीचा प्लॅन सांगून लोकांकडून इन्व्हेस्टमेंट करून घेतलेली आहे. या व्यक्तींनी कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवून आता स्वतः तक्रारदार म्हणून पुढे येत असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व लीडर व्यक्तींवर ही योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं कंपनीसोबत काम करणाऱ्या काही व्यक्तींचे म्हणणे आहे. त्यामुळे आता वेदिक आयुर केअर (ई- स्टोअर इंडिया) या कंपनीबाबत योग्य काय? आणि अयोग्य काय? तसेच नेमकं दोषी कोण? याबाबत खरी माहिती पोलीस तपासानंतरच समोर येईल. त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.