Home स्टोरी इरसाळगड (इरसाळ वाडी) येथे दरड कोसळून ३० ते ४० घरे मलब्याखाली अडकल्याची...

इरसाळगड (इरसाळ वाडी) येथे दरड कोसळून ३० ते ४० घरे मलब्याखाली अडकल्याची शक्यता!

281

२० जुलै वार्ता: खालापूरजवळील इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. (Khalapur Landslide) बुधवारी रात्री इरसाळगड (इरसाळ वाडी) येथे दरड कोसळून ३० ते ४० घरे मलब्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

आतापर्यंत २५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, या गावात ५० ते ६० घरांची वस्ती असून जवळपास २०० ते ३०० मतदार असल्याचे समजते. मलब्याखाली अंदाजे ३० ते ४० घरातील लोक अडकले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे.नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही घटना घडली. इरसाळगडाच्या पायथ्याशी इरसाळ वाडी आहे. आणखी खालच्या बाजुला चौक नावाचे नेताजी पालकर यांचे मुळ गाव आहे. इरसाळगडाच्या पायथ्याला असलेल्या या इरसाळ वाडीत प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे.

दरम्यान, याआधीही रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील ३५ घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये १५१ जणांनी आपले प्राण गमावले होते. माळीण गावावर दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील ७४ पैकी ४४ घरे दबली गेली. यामध्ये १५१ जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे.इरशाळगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड येथील दुर्दैवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळाला जाण्याची शक्यता आहे.धुके, अंधार आणि संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा होत आहे. पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतेय. गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहने जात नाहीत, अर्धा तास चालत जावे लागत आहे. एनडीआरएफ, पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जणांची टीम घटनास्थळी दाखल असून मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, मुंबईहूनही एनडीआरएफच्या आणखी दोन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. मध्यरात्री घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.