वेंगुर्ला प्रतिनिधी (आसोली): वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री देव नारायणाचा वार्षिक अखंड हरिनाम भागवत सप्ताहारंभ गुरुवार १२ सप्टेंबरपासून झाला. दरवर्षी या सप्ताह कालावधीत आसोली दशक्रोशीतील आरवली, सोन्सुरे, मोचेमाड, अणसूर, उभादांडा, तुळस, मातोंड, शिरोडा, आजगाव, फणसखोल, रेडी, सखैलेखोल, सागरतीर्थ, टांक येथील भजनी मंडळे आपाली भजनसेवा सादर करतात. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. हरिनाम सप्ताह निमित्त श्री देव नारायण मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाद्रपद पौर्णिमेला या सप्ताहाची समाप्ती होणार आहे. दशक्रोशीतील भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच हरिनाम भागवत सप्ताहास उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त गावकर, मानकरी, श्री देव नारायण देवस्थान कमिटी व आसोली ग्रामस्थ यांनी केले आहे.