कुडाळ: सिंधुदुर्गातील वार्षिक जत्रोत्सव म्हणजे ‘दहिकाला’ आवळेगावच्या श्री देव नारायणच्या जत्रोत्सवाने सुरुवात होते. आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशी दिवशी होणारा दहिकाला म्हणजे, कोकणातील वार्षिक जत्रोत्सवाची सुरूवात मानली जाते. रविवार 2 नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव पारंपरिक थाटात साजरा होणार आहे.
जत्रोत्सवादिवशी विशेष कार्यक्रम असून सकाळी ७ वा. ब्राम्हण वृंदाकडून श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, १० वा. श्री दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर पायी दिंडी, हरिपाठ, ११:३० वा. सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. नितेश महाराज रायकर (गडहिंग्लज) यांचे किर्तन, दिवसभर माहेरवासिन आणि ग्रामस्थांचा देवाची ओटी भरणे कार्यक्रम असणार आहे. रात्री ११:३० वा. श्रींची पालखी व नंतर १२:३० वा. खानोलकर दशावतार नाटयमंडळाचे दशावतारी नाटक.
यावर्षीची पहिली जत्रा असल्याने मुंबई-गोवा व सिंधुदुर्गातील सर्व भाविक व दशावतारी नाटकाचे नाटय रसिक यांची गर्दी होणार आहे. त्यानिमित्त मंदिराच्या सभोवती खाज्या, खेळणी आणि नवीन पिढीचे शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशी असल्याने नारायण मंदिराच्या बाजूलाच विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे त्यामुळे या जत्रेला विशेष महत्त्व आहे. जत्रेच्या दुसर्या दिवशी सोमवारी सकाळी देवळासमोरील तुळशीचा तुळसीविवाह करुन जत्रेची सांगता केली जाते. तरी सर्वांनी जत्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन आवळेगावचे मानकरी, बंधु आणि ग्रामस्थांनी केले आहे.





