Home स्टोरी आरबीएसके हा सुदृढ जीवनाचा पाया..! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे प्रतिपादन

आरबीएसके हा सुदृढ जीवनाचा पाया..! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे प्रतिपादन

44

मसूरे प्रतिनिधी: बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था पिंगुळी येथे जिल्हास्तरीय आर. बी. एस.के. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबिटकर यांच्या संकल्पनेतून आरबीएसके अंतर्गत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोहीम पुढील महिनाभर संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी  ९ वाजता राज्यस्तरावरून दृक श्राव्य प्रणाली द्वारे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार तसेच आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथून करण्यात आले . त्यानंतर 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था पिंगुळी येथे केले.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन तसेच धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, डॉ करतस्कर, ग्रामीण रुग्णालय कुडाळचे वैद्यकीय अधिकारी डॉ दिगंबर करंबेळकर महिला व बाल रुग्णालयाच्या डॉ मोनालीसा वजराटकर व डॉ वाळके, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षण विभाग,महिला व बालकल्याण विभाग यांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, नेत्रचिकित्सक श्री सावंत, DEIC टीम, हिंदलॅब चे कर्मचारी,आर बी एस के टीमचे समन्वयक श्री राजेश पारधी, विश्वनाथ राव, आर बी एस के च्या बारा टीमचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने कुडाळमधील तीन शासकीय व निमशासकीय शाळा व एका अंगणवाडीतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील एकूण 1100 मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना सेवा देण्यात आली. या तपासणी मधून दोषी आढळलेल्या मुलांवर तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर शिबिरे आयोजीत करून शस्त्रक्रिया व इतर उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी आरबीएसके हा सुदृढ जीवनाचा पाया आहे असे सांगितले. आरबीएसके कार्यक्रमाची माहिती दिली व विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. श्री उमेश गाळवणकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम च्या सर्व डॉक्टर टीम उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.