१२ ऑगस्ट वार्ता: भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आफ्रिका खंडातील नाइजर या देशातील भारतीय नागरिकांना आहे त्या परिस्थितीत लवकरात लवकर देश सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर येत्या काही काळासाठी परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर नाइजरमध्ये जाणंही टाळा असे निर्देशही देण्यात आले आहेत.
नाइजर येथील भारतीयांसाठी जारी करण्यात आलेल्या सूचनेमध्ये परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, ‘नाइजरमध्ये सध्याची परिस्थिती अतिशय तणावपूर्ण असून, भारतीयांना जितकं लवकर शक्य असेल तितकं, आहे त्या परिस्थितीत त्यांनी देश सोडण्याचा प्रयत्न करा. सध्याच्या घडीला नाइजरमध्ये विमानसेवाही बंद आहेत. त्यामुळं रस्ते मार्गानं देश सोडताना प्रचंड काळजी घ्या, सतर्क राहा.’
मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या नाइजरमध्ये साधारण 250 भारतीय अडकल्याची माहिती आहे. त्यामुळं त्यांना या देशातून बाहेर काढणं मंत्रालयाची प्राथमिक आणि प्राधान्याची जबाबदारी राहणार आहे. देशातील धोका पाहता सध्या तिथ जाण्याचे बेत असल्यास ते तूर्तास रद्द करावेत असं आवाहनही केंद्रीय यंत्रणेनं दिलं असून, येथील परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर नाईजर न गाठण्याचा सल्ला दिला आहे. सध्या नाइजरची राजधानी नियामी येथे असणाऱ्या दूतावासामध्ये भारतीय नागरिकांना आपली नोंदणी करण्यास सांगण्यात आलं आहे. यासाठी आपात्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला असून, तिथं असणआऱ्या नागरिकांना कोणतीही शंका असल्यास त्यांना या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क करणअयाची विचारणा करण्यात आली आहे. दुतावासाचा दूरध्वनी क्रमांक आहे, (+ 227 9975 9975).