कुडाळ (मुळदे): उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक(NDRF), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन शालेय प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे संपन्न झाला. सदर कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षणात NDRF, सिंधुदुर्ग येथील १५ सदस्यीय दक्ष आणि प्रशिक्षित पथकाने मार्गदर्शन केले. यामध्ये निरीक्षक व पथक प्रमुख श्री. आर. जे. यादव यांच्यासह पथकातील इतर तज्ज्ञ प्रतिनिधींनी उपस्थित राहून सैद्धांतिक व प्रात्यक्षिक सत्रांद्वारे विविध आपत्ती स्थितींचे मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणामध्ये खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता:
• NDRF ची कार्यपद्धती, शिस्तबद्ध रचना व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा
• CPR (कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन) चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व जीवनरक्षण कौशल्य
• आग लागल्यास होणाऱ्या जळजळीत जखमा व त्यावरील प्राथमिक उपचार
• हाडे मोडणे, रक्तस्त्राव यासारख्या आपत्तीजन्य अवस्थांवर तातडीची मदत
• पूरस्थितीत सुरक्षितता – फ्लोटिंग डिव्हाइसेस वापरण्याचे प्रात्यक्षिक
• आग, पूर व इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये वर्तन व आपली सुरक्षा कशी करावी याचे मार्गदर्शन
• विविध आधुनिक आपत्ती व्यवस्थापन उपकरणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन व वापराचे प्रात्यक्षिक
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. विशेषतः महाविद्यालयाच्या NSS विभागातील ३४ कॅडेट्स तसेच NSS स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व डॉ. व्ही. व्ही. दळवी, सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी “आपत्ती व्यवस्थापन हा केवळ प्रशासनाचा नाही तर प्रत्येक सुजाण नागरिकाचा सामाजिक आणि नैतिक दायित्वाचा विषय आहे” असे नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळात पहिल्या प्रतिसादकर्त्याच्या भूमिकेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षवर्धन वाघ, सहाय्यक प्राध्यापक व राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रभारी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. गिरीश उईके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांनी समन्वय व नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांनी घेतलेला हा उपक्रम केवळ शालेय प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या मनात आपत्तीजन्य प्रसंगांमध्ये सजगतेचा, शिस्तीचा व सहकार्याचा दीप प्रज्वलित करणारा ठरला.