पुणे येथील ‘शिवसेवा प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘अखंड भारत स्मरणदिन’ !
पुणे: परकियांच्या आक्रमणामुळे भारत देश क्षेत्रफळानुसार अल्प झालाच आहे; परंतु पूर्वीची नावेही आपण विसरून गेलो. खर्या इतिहासाचा आपल्याला पडलेला विसर हेच सगळ्यात मोठे दुर्दैव आहे, असे मत ‘समर्थ सेवा मंडळा’चे अध्यक्ष सुहास क्षीरसागर यांनी व्यक्त केले. शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सुमित्रा हॉल येथे ‘अखंड भारत स्मरणदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
क्षीरसागर पुढे म्हणाले की, इराणपासून मलेशियापर्यंत पसरलेल्या भारताचे आक्रमणांमुळे तुकडे होत राहिले. इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, नेपाळ, व्हिएतनाम, लाओस, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका हे सर्व देश हळूहळू भारतापासून तोडले गेले. येणारी युवा पिढी, तसेच आताच्या पिढीने, तरुणांनी ही सर्व आक्रमणे लक्षात घेतली पाहिजेत. ज्या भूमीवर पूर्वजांचे राज्य होते, त्या ठिकाणी आपली सत्ता होती, तो सर्व भूभाग, तसेच आम्ही आमची भूमी परत घेऊ. पुन्हा एकदा भारतभूमीला ‘सुजलाम् सुफलाम्’ करू, असा संकल्प केला पाहिजे.