Home क्राईम आतंकवाद्यांनी आयोजित केले होते बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर !

आतंकवाद्यांनी आयोजित केले होते बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर !

130

आतंकवाद्यांनी पुरलेले बाँब बनवण्याचे साहित्य, पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त !

६ ऑगस्ट वार्ता: आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला झुल्फिकार बडोदावाला याने कोथरूडमधून अटक केलेल्या २ आतंकवाद्यांच्या साहाय्याने इतर साथीदारांसाठी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे शिबिर आयोजित केले होते. ज्या ठिकाणी बाँबचे साहित्य पुरून ठेवले होते, त्या ठिकाणाहून रासायनिक द्रव्य आणि ‘केमिकल पावडर’, प्रयोगशाळा उपकरणे, थर्मामीटर, पिपेट (छोट्या प्रमाणात द्रव पदार्थ एका बाटलीतून दुसर्‍या बाटलीत नेण्यासाठी वापरण्यात येणारी बारीक नळी) असे बाँब बनवण्याचे साहित्य आतंकवाद्यांकडून जप्त करण्यात आले आहे.

दोन्ही आतंकवाद्यांनी वापरलेली १ चारचाकी, २ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आतंकवादविरोधी पथकाला (ए.टी.एस्.ला) यश आले आहे.या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या अन्वेषणात तसेच त्यांच्याकडील ‘इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस’मध्ये मिळालेल्या माहितीद्वारे त्यांचे इसिस या आतंकवादी संघटनेशी असलेले संबंध अन्वेषणात निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणी फरार झालेल्या आतंकवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.