सिंधुदुर्ग: आडाळी येथिल एम.आय.डी.सी प्रकल्प सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्याची मागणी कुंब्रल ग्रामस्थ गिरीश परब व महाराष्ट्र विकास मंच अध्यक्ष जितेंद्र सावंत यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे महाराष्ट्र शासनाने एम. आय.डी.सी. प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा संपादित केली आहे. मात्र प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली किंवा प्रयत्न होताना दिसत नाहीत. दोडामार्ग तालुक्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु शिकलेल्या हजारो युवकांना नोकरीसाठी मुंबई, गोवा, पुणे या ठिकाणी जावे लागते. आडाळीचा हा प्रकल्प सुरू झाल्यास येथिल युवाकांना येथेच रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्यात यावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.








