वर्कऑर्डर न दिल्याने कुडाळ,मालवण मधील ३५ रस्त्यांची कामे रखडली….!
ग्रामविकास विभागाचे अधिकारी किंवा मंत्री पैसे घेतल्याशिवाय वर्कऑर्डर देत नाहीत….!
पालकमंत्र्यांचा अपमान कि, खात्यावर अंकुश नाही की, अधिकारी जुमानत नाहीत?
सिंधुदुर्ग: महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुडाळ मालवण तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेधून ३५ रस्त्यांची कामे मंजूर झालेली आहेत. या कामांची निविदा एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध होऊन देखील आता सहा महिने झाले तरी सदर कामांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या नाहीत. ग्रामविकास विभागाचे अधिकारी किंवा मंत्री हे पैसे घेतल्याशिवाय कामांना मंजूरी आणि वर्क ऑर्डर देत नाहीत असे आपल्या कानावर आले आहे त्यामुळे हि कामे रखडली आहेत असा खळबळजनक आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. पुढील आठ दिवसात निविदेच्या वर्कऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर त्या ३५ गावातील लोकांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय बंद करु असा इशारा आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ पंचायत समिती येथील पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात धडक देत कुडाळ- मालवण तालुक्यातील रस्त्याच्या कामांबाबत आढावा घेतला. कामांना वर्कऑर्डर न दिल्याबाबत कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांना जाब विचारला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, गंगाराम सडवेलकर, दिनेश वारंग,माणगाव सरपंच मनीषा भोसले, तेंडोली उपसरपंच संदेश प्रभू, उमेश कविटकर, प्रवीण कदम आदीनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी कनिष्ठ अभियंता साईनाथ चव्हाण (मालवण ),कनिष्ठ अभियंता अमोल कोचरेकर (कुडाळ) उपस्थित होते.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंतप्रधान सडक योजनेतील व मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे रस्ते मंजूर झाले. नोव्हेंबर २०२२ मध्ये या रस्त्याच्या निविदांना सुरुवात झाली होती. एप्रिल २०२३ ला या रस्त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. ठेकेदारांचे रेट या संदर्भातील सगळ्या गोष्टीमुळे निविदा भरल्या गेल्या नव्हत्या. परंतु दोन महिन्यापूर्वी या निविदा भरण्यात आल्या.त्यातील कुडाळ- मालवण तालुक्यातील ३५ कामांपैकी एकाही कामाला वर्क ऑर्डर मिळालेली नाही. त्यामुळे हे रस्ते रखडले आहेत. सदर रस्त्यांची कामे मंजूर असल्याने त्यावर डीपीसी फंडातून किंवा इतर फंडातून पैसे खर्च करु शकत नाहीत.
पालकमंत्र्यांनी भुमिपूजन केलेल्या कामांच्या वर्कऑर्डरच नाहीत..,
चिंदर गावातील दोन कामांची भूमिपूजने पालकमंत्र्यानी एक महिन्यापूर्वी केली आहेत. परंतु त्या दोन्ही रस्त्याची वर्कऑर्डर निघालेली नाही. भूमिपूजन होऊन एक महिना उलटला आहे अद्यापही त्या रस्त्याची वर्कऑर्डर मिळालेली नाही. पालकमंत्री हे कुठल्याही पक्षाचे असूदे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.त्यांचा सुद्धा हा अपमानच आहे. किंवा त्यांना माहिती असून सुद्धा ते अस का करतात? त्यांचा त्या खात्यावर अंकुश नाही की काय? किंवा जिल्ह्यातील अधिकारी त्यांना जुमानत नाहीत की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील ८ दिवसात कामे सुरु झाली नाही तर त्या ३५ गावातील लोकांना घेऊन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यालय बंद करू असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले आहे.