आता पोलिसांचा लक्ष “त्या” फाऊंडेशनच्या सदस्यांकडे!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सिंधुदुर्गात अनैतिक धंद्यांमध्ये वाढ होत आहे. गोवा बनावटीची दारू वाहतूक, मटका, जुगार यासारख्या अनैतिक धंद्यांबरोबरच वेश्याव्यवसाय ही चालू होता. आजगाव येथील कारवाईमुळे ते समोर आले. या प्रकरणातील मुख्य चालक संतोष मधुकर लुडबे याला काल अटक केल्यानंतर आज वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत म्हणजेच सावंतवाडी येथील जेलमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दरम्यान पुढील तपासामध्ये आता पोलिसांचा लक्ष “त्या” फाऊंडेशनच्या सदस्यांकडे असणार आहे. आजगांव येथे संतोष मधुकर लुडबे हा अन्नपुर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फौंडेशन या संस्थेच्या नावाखाली महिला, मुली यांना आणून “वेश्याव्यवसाय” करीत होता. याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी, ग्रामपंचायतने या वेश्या व्यवसायावर कारवाई करावी व तो बंद करावा अशी मागणी पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली होती. या तक्रारींची दखल घेऊनच पोलिसांनी कालची कारवाई केली असे स्थानिकांचे म्हणणे आहे.त्या वेश्या व्यवसाया वर जेव्हा काल पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी केलेल्या तपासणीत तेथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीसह त्या ठिकाणी तीन परराज्यातील महिला आढळून आल्या. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील तिन्ही महिलांना सुरक्षिततेसाठी अंकुर केंद्र सावंतवाडी येथे पाठविण्यात आले. तर पोलीस ठाण्यात भा. द. वि. क. ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५९ / THE IMMORAL TRAFFIC PREVENTION ACT (PITA) कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करून संतोष लुडबे याला अटक केली. त्याला आज वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा निर्णय दिला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे करीत आहेत.