Home स्टोरी आकाशी चंद्र चांदण्याची साक्ष देत कोमसाप कवी संमेलन बहरलं.

आकाशी चंद्र चांदण्याची साक्ष देत कोमसाप कवी संमेलन बहरलं.

260

अध्यक्ष अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत व त्यांच्या टीम चे यशस्वी नियोजन…

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेमार्फत काव्यफुलांच्या बरसातीने आगळीवेगळी कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. काल शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी कोजागरीचे औचित्य साधून येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात खुल्या कविसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते. कवी-कवयित्रींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वेचक-वेधक अशा कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले.  बेळगाव येथील कवी तथा कोम सापचे ज्येष्ठ सदस्य वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले.

प्रारंभी कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या हस्ते वाय. पी. नाईक यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या ग्रामीण भागातील जीवन जिवंत उभ्या करणाऱ्या कवितेने संमेलनास प्रारंभ झाला. कोजागिरी ला आकाशी चंद्र चांदण्याची साथ घेत सावंतवाडीच्या मोती तलावाच्या शेजारी असलेल्या राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात कोजागरी कवी संमेलन मैफिल ची सांज रंगली.

 

 

गतवर्षी केशवसुत कट्टा येथे कोजागिरी कवी संमेलन महफिल घेण्यात आली होती. यंदा चे हे दुसरे वर्ष कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळी कवी संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर कोमसापाचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, जिल्हा खजिनदार भरत गावडे,  खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर, म. ल. देसाई, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे,  सुहासिनी सडेकर, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील,  प्रज्ञा मातोंडकर,  मंगल जोशी नाईक, ऋतुजा सावंत भोसले, मानसी भोसले, रामदास पारकर ला, प्रा. गणेश मर्गज, प्रा. एन. डी. कार्वेकर, विकास गोवेकर, किशोर वालावलकर, मनोहर परब, दत्ताराम सावंत, संतोष पवार आधी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना श्री नाईक म्हणाले की, “मनातलं गाव नेहमी आठवतं, बालपण लाल मातीशी नाव जोडलं, शेत झाड जनावर आठवतात, नांगर हकताना बैलाची संगत मनात कोरलेली आहे. नांगर हकतांना बैलाची संगत मनात कोरलेली आहे.”  आजही ही कविता त्यांनी सादर करत कोमसापाच्या साहित्य चळवळीविषयी आपले योगदान स्पष्ट करत अशी कवी संमेलने व्हायला हवी. या माध्यमातून नवोदित कवी तयार होण्यास चालना मिळत आहे  असे त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम यांच्या सुत्रसंचालनाने या कविसंमेलनाला एक वेगळीच उंची लाभली. त्यानंतर शिक्षक किशोर वालावलकर यांनी ‘वाडीतलो पावस’ ही लाजवाब मालवणी कविता सादर केली .

“पावसात सुंदरवाडी अधिकच सुंदर गमता…

ढगांच्या ढोलार पावस झाडापेडा हलवता…” या कवितेने सावंतवाडीतील पावसाळा डोळ्यासमोर उभा केला.

सौ. मंगल नाईक-जोशी यांनी ‘पहाटेचा प्राजक्तसडा’ या काव्यातून अंगणातील पारिजातकाचे सुंदरसे वर्णन केले. आघाडीचे कवी दीपक पटेकर यांनी वृत्तामध्ये बांधलेल्या काव्याने कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीचे आभाळातील चंद्र- चांदण्यांचे वर्णन करून कोजागरीची प्रतिमा उत्तम साकारली. शिक्षक मनोहर परब यांच्या माणसाच्या अस्तित्वावर भाष्य करणाऱ्या कवितेने उपस्थितांना अंतर्मुख केले. यावेळी सर्वच कवितांना उपस्थितांचीही उत्तम दाद मिळतांना दिसत होती. शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर यांच्या  ”ती कधी दमतच नाही..” या कवितेने स्त्रीचे कष्टकरी जीवन अचूक टिपले. मोठा व्याप सांभाळूनही ती दमत कधीच नाही, हे त्यांनी पद्यातून उत्तम साकारले.  शिक्षिका ऋतुजा भोसले यांनी घेतलेला मानवी मनाचा वेध लक्षवेधी ठरला. शिक्षक दत्ताराम सावंत यांनी  शेतकरी बंधूचे महत्त्व सांगणारे काव्य सादर केले.  सौ. आशा मुळीक यांनी ”कोजागरीला आकाशी चंद्र- चांदण्यांची साथ” म्हणून सादर केलेल्या कवितेने रसिकांना जिंकून घेतले. तर कवी दीपक पटेकर यांनीही बहारदार कविता कोजागिरी निमित्त सादर केली. स्वप्ना गोवेकर यांनी सादर केलेल्या ”क्षितीजापलीकडील तू अन् मी बरसणारी पावसाची सर ..” या आशयाच्या कवितेनेही रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम यांनी आजच्या समाजातील धक्कादायक वास्तवावर बोट ठेवून ”ही पॉलिसी समजली पाहिजे..” या आशयाचे जबरदस्त काव्य सादर करून सर्वसामान्य माणसांची होणारी फसवणूक मांडली. सुहासिनी सडेकर यांनी सादर केलेली माकडांवरील कविता रसिकांना अंतर्मुख करून गेली. पत्रकार  प्रा. रुपेश पाटील यांनी आज धर्माधर्मात विनाकारण होणाऱ्या वादावर मार्मिकपणे बोट ठेवणारी कविता सादर करून रसिकांना क्षणभर अंतर्मुख केले. मनोहर परब, संतोष पवार आदींच्या कवितांनी या कविसंमेलनात चैतन्य आणले.  प्रत्येक काव्याला रसिकांमधून टाळ्या मिळत होत्या.

समारोपावेळी आभार व्यक्त करताना कवी रामदास पारकर यांनी तालासुरात सादर केलेल्या मालवणी काव्याला रसिकांनीही ठेका ठरला. यावेळी जिल्हा खजिनदार भरत गावडे यांनी सर्व कवींच्या कविता, आरती मासिकांमधून प्रसिद्ध केल्या जातील असे स्पष्ट केले. कोमसापचे कोजागरी संमेलन अविस्मरणीय झाले.

फोटो: सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या कोजागिरी कवी संमेलन चे अध्यक्ष बेळगाव येथील व कोमसापाचे ज्येष्ठ सदस्य वाय. पी. नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, बाजूला विठ्ठल कदम, भरत गावडे, म. ल. देसाई दीपक पटेकर आधी.

छाया: भारत फोटो स्टुडिओ