मसुरे प्रतिनिधी: प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली.
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची
देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकाना केंद्रबिंदु मानुन भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.
आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागली आहे.सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेले काही दिवस यात्रेच्या तारीख निश्चितीबाबत अफवा पसरविल्या जात होत्या. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर या सर्व अफवांना आता पुर्णविराम मिळाला आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळा बरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्या नंतर श्री देवी भराडी मंदिर आज २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.