सावंतवाडी: असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात असनिये हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक सोयी व सुविधांसाठी ५० हजार रूपयांची देणगी दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपिठावर अध्यक्षस्थानी असनिये माजी सरपंच तथा धी. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वय समितीचे सदस्य एम. डी. सावंत, प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीच्या एस. पी. के. काॅलेजचे निवृत्त प्राध्यापक दिलीप गोडकर, सुधीर सावंत, प्रशालेचे माजी शिक्षक तथा बांदा हायस्कुलचे सहाय्यक शिक्षक रणधीर रणसिंग, शालेय समिती सदस्य रामा गावडे, कमलाकर सावंत, विजय सावंत, शरद सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात एम. डी. सावंत यांनी प्रशालेच्या उभारणी पासुनचा खडतर प्रवास उलगडून सांगताना विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. दिलीप गोडकर यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर आपली क्षमता वाढवावी लागेल याची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिली. माजी शिक्षक रणधीर रणसिंग यांनी प्रशालेचा संपुर्ण उज्ज्वल काळ उलगडून सांगितला. सुधीर सावंत यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका जान्हवी सावंत यांनी प्रशालेच्या भौतिक गरजांवर प्रकाश टाकून यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशालेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
यावेळी प्रशालेचे माजी शिक्षक रणधीर रणसिंग यांचा एमटी सावंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शालांत परीक्षेत शाळेतून दहावित प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या सायली शिवा गावकर, समृद्धी नामदेव गावडे, स्नेहल संजय गावडे यांच्यासह विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये व संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक तसेच चषक देवून गौरविण्यात आले. तसेच प्रशालेतील यावर्षीचा आदर्श विद्यार्थी कु. आर्यन लवू गावडे आणि आदर्श विद्यार्थीनी कु. तन्वी शंकर ठिकार यांनाही मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.
यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. राठोड यांनी अहवाल वाचनात प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासह प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत प्रशालेच्या विविध उपक्रमांसह शैक्षणिक विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यावेळी पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत, सुत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक परेश देसाई तर आभार लिपीक जी. बी. सावंत यांनी मानले.