कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आजच्या बैठकीत निर्णय.
सावंतवाडी: कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेस कास्ट्राईब महासंघाचे राज्य महासचिव सुरेश तांबे तसेच सर्व कास्ट्राईब महासंघाच्या विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभाग सिंधुदुर्गमधील १४ जानेवारी २०२२रोजीच्या आरोग्य सेवक पुरुष पदाच्या सेवाजेष्ठता यादीवर व पदोन्नती प्रक्रियेवर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग आणि अन्याग्रस्त कर्मचारी महेंद्र यशवंत कदम यांनी दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी अप्पर आयुक्तांकडे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया बाबत अपील दाखल केलेले होते. सदर अपिलावर सुनावणी होवून अपील मान्य करून सुधारित ज्येष्ठता यादी तयार करून पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यासंबधित स्पष्ट आदेश दिलेले आहेत. सदर निर्णय देवून जवळजवळ चार महिने झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून देखिल पदोन्नती प्रक्रियेची अमंलबजावणी झालेली नाही. मात्र त्याच निर्णयाआधारे काही जनांना पदानवत केलेले आहे. थोडक्यात फक्त पदानवत करून अप्पर आयुक्तांच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज काही आरोग्यसेवक देत आहेत. त्याला आरोग्य प्रशासन साथ देत आहे तसेच पात्र आरोग्य सेवकांना अजुन पदोन्नती दिलेली नाही. अप्पर आयुक्तांच्या पत्रान्वये पदानवत व पदोन्नती एकाच वेळी करणे अपेक्षित होती. तसेच अपिलार्थी आरोग्य सेवक महेंद्र यशवंत कदम यांना पदोन्नती देण्यात यावी तसेच आरोग्य सेवक पदोन्नती यादी पूर्ण करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य अधिकारी खातेप्रमुख यांचे मार्फत आठ दिवसात कार्यवाही करणे बाबत मा .अपर आयुक्त यांनी निर्देश दिलेल असतानाही चार महिने उलटुन गेले तरि न्याय मिळालेला नाही .
मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून देखिल पदोन्नतीची अमंलबजावणी न झाल्याने जिल्हा परिषद प्रशासन मागासवर्गिय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उदासिन व वेळकाढू धोरण अवलंबित असुन मा .अप्पर आयुक्तांच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत आहे. अपर आयुक्तांच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात कसुर करणाऱ्या अधिकांऱ्यांवर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी तसेच पदोन्नती ची यादी तात्काळ जाहीर करावी .अन्यथा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सभेत ठरल्या प्रमाणे सात दिवसानंतर जिल्हा परिषदे समोर आरोग्य सेवक पदोन्नती संदर्भात धरणे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले .
सदर वेळी कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम, राज्यमहासचिव सुरेश तांबे, जिल्हा महासचिव किशोर कदम, कास्ट्राईब आरोग्य संघटना जिल्हाध्यक्ष संजय जाधव आरोग्यजिल्हासचिव अविनाश धुमाळे, जिल्हाउपाध्यक्ष महेंद्र कदम, जिल्हा कार्यालयीन सचिव दीपक कांबळे, शंकर कदम, सुधीर धामनकर महिला आघाडी उपाध्यक्ष ज्योती कदम, महादेव कोकरे, सखाराम गुरखे कास्ट्राईब शासकीय – निमशासकीय वाहनचालक संघटना जिल्हाध्यक्ष संतोष कदम, माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर, महासचिव अभिजित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किशोर यादव, संदीप नागभिडकर, अमोल शेळके, नचिकेत पवार, ज्येष्ठ सल्लागार अजितकुमार देठे, प्राथमिक संघटना माजी अध्यक्ष अमित ठाकुर, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी आभार किशोर कदम यांनी व्यक्त केले.