१३ ऑगस्ट वार्ता: राष्ट्रवादी पक्षातून बंड करत शिंदे सरकारमध्ये सामील झालेल्या अजितदादा पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, अजितदादा गटाकडून राज्याचा दौरा करण्यात येणार आहे. तसेच ९ मंत्र्यांकडून राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबारही सुरू करण्यात येणार आहे. काल मुंबईतील मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकेर यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे नेते तसेच मंत्री सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्षवाढीसाठी दौरे करतील, असा निर्णय घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे, अजितदादा गटाकडून ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी दौरे करण्यात येणार आहे, त्यात शिंदे गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. यापूर्वी भाजपानेसुद्धा अलीकडे शिंदेंचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले, सोबतच काही केंद्रीयमंत्र्यांना मैदानात उतरविले आहे. त्यातच आता अजितदादा गटानेही शिंदे यांच्या गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, अजितदादा यांच्या सरकारमध्ये एन्ट्रीनंतर शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे.