Home स्टोरी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशन जांबावली गोवा येथे २८,२९ जानेवारी रोजी...

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशन जांबावली गोवा येथे २८,२९ जानेवारी रोजी होणार…!

147

सावंतवाडी: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांचे ५६ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २८ जानेवारी आणि २९ जानेवारी २०२४ ला दामोदर संस्थान जांबावली केपे गोवा येथे भरत आहे. सदर अधिवेशन श्री. शामराव कराळे अध्यक्ष साने गुरुजी कथामाला यांच्या अध्यक्षतेखाली भरत असून श्री.सुभाष उत्तम फळदेसाई, मंत्री समाज कल्याण पुरातत्त्व खाते गोवा हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजन गवस यांनाही निमंत्रिकरण्यात आले आहे. स्वागताध्यक्ष म्हणून गोवा कथामालेचे विश्वस्त आणि गोव्यातील सुप्रसिद्ध उद्योजक संदीप निगळये हे उपस्थित राहणार आहेत.

सदर अधिवेशनाचे आयोजन कथामालेसोबतच कला आणि सांस्कृतिक विभाग गोवा आणि गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. यात शोभायात्रा, गोमंतकीय लोकनृत्ये यासोबतच विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कथाकथन जीवनमूल्यांचा शोध, कथाकथन विविध कलांचे मूळ, कथाकथन भाषिक आवड आणि अभिरुची या तीन महत्त्वपूर्ण परिसंवादासोबत अनेक परिसंवाद होणार आहेत. साने गुरुजी शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनास कोकणातील कथामाला प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री.सुरेश ठाकूर, अध्यक्ष साने गुरूजी कथामाला मालवण यांनी केले आहे.