मसुरे प्रतिनिधी:
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे नवरात्र महोत्सवा निमित्त देवीची स्थापना व घटस्थापना करण्यात आली. यानंतर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते व मंदार पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या मंत्रोच्चारात देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी वटवृक्ष मंदिरातील नवरात्र महोत्सवास प्राचीन परंपरा आहे. या नवरात्री महोत्सवास अनन्य साधारण असे महत्व आहे. नारीशक्तीच्या या उत्सवात अनेक माता, भगिनी या देवीचे दर्शन घेवून पावन होतात. या नवरात्र महोत्सव कालावधीत देवस्थानच्या वतीने ३ दिवसीय “देवी महात्म्य” या पोथीचे पारायण आयोजन करण्यात येते. दरवर्षी अनेक महीला भक्त या पारायण सेवेत सहभागी होतात. या पारायण सेवेत देवी महात्म्य पोथीचे वाचन केल्याने इच्छीत फलप्राप्ती होते अशी माता भगिनी भक्तांची श्रध्दा आहे, त्यामुळे नवरात्र महोत्सवात देवी महात्म्य पोथीचे पारायण हे इच्छीत फलप्राप्ती करण्याचे भक्तीमार्ग आहे असे मनोदय व्यक्त केले.
कोजागरी पौर्णिमेस देवस्थानकडुन महानैवेद्य दाखवून दुध प्रसाद वाटप होवून या उत्सवाची सांगता होते अशीही माहिती इंगळे यांनी दिली. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रा.शिवशरण अचलेर, बंडेराव घाटगे, अमर पाटील, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, महेश मस्कले, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, सिद्धाराम कुंभार, प्रदीप हिंडोळे, संतोष जमगे आदींसह अनेक महिला देवीभक्त व स्वामी भक्त उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले.