Home स्टोरी ८५ वर्षीय माजी सैनिक विठ्ठल गावडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य...

८५ वर्षीय माजी सैनिक विठ्ठल गावडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेस्त्री यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण…!

116

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील माजी सैनिक विठ्ठल मालू गावडे (वय ८५) यांच्या घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत असा रस्ता मंजूर झालेला आहे. ग्रामपंचायत च्या ताब्यातील रस्त्यांची नोंदवही मधील नमूद अनुक्रमांक ५८, रस्त्याचे  नाव चौकुळ मुख्य रस्ता ते खासकिलवाडा अंतर्गत मुख्य रस्ता असे नमूद आहे. मंजूर रस्त्याची लांबी १५० मीटर आणि रुंदी ३ मीटर आहे. हा रस्ता मंजूर झाल्यानंतर चौकुळ गावातील माजी सैनिक विठ्ठल मालू गावडे यांनी रस्ता पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे विनंती केली. परंतु ग्रामपंचायत सरपंच यांनी वेळोवेळी याकडे दुर्लक्ष केले आणि या रस्त्याचे काम आजपर्यंत पूर्ण केलेच नाही. माजी सैनिक विठ्ठल मालू गावडे यांनी संबंधित विषय ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अभिजीत मेस्त्री यांना सांगितल्यानंतर अभिजीत मेस्त्री यांनी याबाबत योग्य तो पाठपुरावा केला. हा रस्ता पूर्ण करणे बाबत अभिजीत मेस्त्री यांनी ग्रामपंचायतीला लेखी निवेदनाद्वारे विनंती ही केली. परंतु समाजकंटकांकडून जाणून बुजून त्या रस्त्याचे काम पूर्ण न होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे चौकुळ ग्रामपंचायत सरपंच या सर्व प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.

निवेदन
निवेदन

चौकुळ मुख्य रस्ता ते खासकिलवाडा अंतर्गत मुख्य रस्ता पूर्ण करण्यासाठी चौकूळ ग्रामपंचायत सरपंच दिरंगाई, चालढकल, वेळकाढूपणा व कर्तव्यात कसूर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा सर्व विषय लक्षात घेऊन तसेच माजी सैनिक विठ्ठल मालू गावडे त्यांच्यावर होत असलेला अन्याय विचारात घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिजीत मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक भाई केसरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना या प्रकाराबाबत लेखी माहिती द्वारे निवेदन देत आज २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. आज सावंतवाडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वयोवृद्ध माजी सैनिक माजी सैनिक विठ्ठल मालू गावडे त्यांचा मुलगा संतोष गावडे आणि चौकोळ ग्रामपंचायत सदस्यता सामाजिक कार्यकर्ते अभिजीत मेस्त्री यांनी आमरण उपोषण करत आहेत. आता याबाबत जिल्हा प्रशासन आणि चौकुळ ग्रामपंचायत सरपंच काय निर्णय घेतील? यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. जोपर्यंत या रस्त्याबाबत योग्य तो निर्णय प्रशासनाकडून मिळणार नाही. तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही. अशी माहिती अभिजीत मेस्त्री यांनी दिली आहे.