Home स्टोरी ४०,००० रुद्राक्षांपासून बनविली स्वामी समर्थ प्रतिमा ! जोगेश्वरीच्या स्वामी भक्तांनी साकारलेली रुद्राक्ष...

४०,००० रुद्राक्षांपासून बनविली स्वामी समर्थ प्रतिमा ! जोगेश्वरीच्या स्वामी भक्तांनी साकारलेली रुद्राक्ष स्वामी प्रतिमा अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात स्थापीत…..१२ फूट लांब आणि १० फूट रुंदीची आहे प्रतिमा “

140

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मुंबई- जोगेश्वरी येथील स्वामीभक्त ओंकार वाघ यांनी सुमारे ४०,००० पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारलेली स्वामींची प्रतिमा अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शेजघर समोरील परिसरात स्थापीत करण्यात आलेली आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या रुद्राक्ष प्रतिमेचे अनावरण मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

अक्कलकोटचे स्त्री रोग तज्ञ डॉ.आसावरी पेडगावकरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सोलापूरचे धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांच्या हस्ते फीत कापून या रुद्राक्ष प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. प्रारंभी पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी कलाकार ओंकार वाघ, अभियंता शिवशरण हडलगी यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी ओंकार वाघ हे एक उत्तम कलाकार आहेत. त्यांची स्वामी भक्ती ही खूप मोठी आहे. या भक्ती प्रेमातूनच त्यांनी या ४०,००० पंचमुखी रुद्राक्ष पासून बनविलेली स्वामींची प्रतिमा साकारलेली आहे. ही प्रतिमा जवळपास १२ फूट लांब आणि १० फूट रुंदीची आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांना स्वामी दर्शनासोबतच या आगळ्यावेगळ्या प्रतिमेतून भाविकांना स्वामी दर्शनाचे नेत्र सुख नक्कीच अनुभवायला मिळेल असे मानस व्यक्त करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वामी दर्शनासोबतच या रुद्राक्ष प्रतिमेचेही दर्शन भाविकांनी घेऊन कृतार्थ व्हावे असे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, संजय पवार, शिवशरण अचलेर, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, कलाकार ओंकार वाघ, कुणाल संसारे, हर्षल माने आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते. स्वामींची ही रुद्राक्ष प्रतिमा साकारण्यात कलाकार ओंकार वाघ यांना कुणाल संसारे, हर्षल माने, रोहन बाईक, वैष्णव मोरे, अमोल जाधव, गणेश नारकर इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले आहे, तर ही प्रतिमा वटवृक्ष मंदिरात स्थिरावण्याकामी महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शिवशरण हडलगी व सैफ फॅब्रिकेशनच्या वतीने दौलत नदाफ व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

फोटो रुद्राक्ष प्रतिमेचे फीत कापून अनावरण करताना धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, डॉ.आसावरी पेडगावकर, महेश इंगळे, मंदार पुजारी व अन्य दिसत आहेत.