Home स्टोरी स्वच्छता मोहिमेनंतरही एस्.टी. बसस्थानके अस्वच्छ का? सुराज्य अभियान

स्वच्छता मोहिमेनंतरही एस्.टी. बसस्थानके अस्वच्छ का? सुराज्य अभियान

65

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक! दिनांक : ११ एप्रिल २०२३

महाराष्ट्रातील एस्.टी. महामंडळाच्या 16 मुख्य बसस्थानकांच्या दुरावस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांना सादर!


मुंबई: – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाने सर्व एस्.टी. बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. ही मोहीम घोषित करून ४ महिने झाले आहेत; प्रत्यक्षात मात्र राज्यातील मुख्य बसस्थानके अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील अशा अस्वच्छ १६ बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह एस्.टी. महामंडळाला देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन ही छायाचित्रे आणि त्याविषयीची माहिती त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मुख्य बसस्थानकांची अशी दुरावस्था झाली असेल, तर राज्यात खरोखर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे का कि ही मोहीम कागदावरच आहे ? असा प्रश्न उपस्थित करत या मोहिमेचा आढावा घेऊन बसस्थानक स्वच्छता मोहीम प्रामाणिकपणे राबवण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीअंतर्गत ‘सुराज्य अभियाना’कडून करण्यात आली. या वेळी व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी ‘या प्रकरणात लक्ष घालतो’, असे आश्वासन दिले. बसस्थानक स्वच्छता मोहिमेची ही वस्तुस्थिती मा. मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री एकनाथजी शिंदे यांनाही व्हावी, यासाठी ही सर्व माहिती परिवहन विभागाकडेही सुपूर्द करण्यात आली.
सोलापूर, देगवड, सावंतवाडी, भुसावळ, जळगाव, दापोली, राजापूर, खेड, रत्नागिरी, सातारा, स्वारगेट, कराड, अमरावती, अकोला, आर्णी आणि वणी बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती आणि छायाचित्रे प्रशासनाकडे देण्यात आली. यामध्ये प्रसाधनगृहाची दुरावस्था, बसस्थानकांच्या परिसरात कचर्‍याचे साम्राज्य, भित्तीपत्रकांमुळे विद्रूप झालेल्या भिंती, तुटलेली व अस्वच्छ बाकडी, बंद असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ, जळमटांनी माखलेले छत, परिसरातील खड्डे, बंद उपहारगृहे आदी बसस्थानकांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे आढळून आले आहे. या प्रत्येक बसस्थानकांचे विभागीय नियंत्रक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेही ‘सुराज्य अभियाना’कडून ही माहिती देण्यात येणार आहे. एस्.टी. महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तरी ‘स्वच्छ बसस्थानक’ ही संकल्पना ‘प्रत्यक्षा’त यावी, तसेच बसस्थानकांवर किमान प्राथमिक सुविधा तरी उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

आज नफा-तोटा यांचा विचार न करता एस्.टी. रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी अखंडपणे धावते. एस्.टी.चा उत्कर्ष करायचा असेल, तर प्रथम बसस्थानकाच्या स्वच्छतेसह प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी चांगल्या प्रकारे दिल्या पाहिजेत, तसेच केवळ मोहिमेपुरती बसस्थानके स्वच्छ न ठेवता कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना आखण्यात यावी, अशीही मागणी सुराज्य अभियानाने शासनाकडे केली आहे.

आपला विश्वासू,
श्री. अभिषेक मुरुकटे,
समन्वयक, सुराज्य अभियान, महाराष्ट्र राज्य,
(संपर्क : 9821541107)