Home शिक्षण स्पर्धेच्या युगात करिअरबाबत विद्यार्थी, पालकांनी सजग राहणे गरजेचे.. ! – प्रा. राजाराम...

स्पर्धेच्या युगात करिअरबाबत विद्यार्थी, पालकांनी सजग राहणे गरजेचे.. ! – प्रा. राजाराम परब.

92

‘विचार’ एज्युकेशन, पुणे मार्फत बांदा येथे ‘प्रशस्त’ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

सावंतवाडी: आज सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात करिअरबाबत पालक व विद्यार्थ्यांनी सजग असणे आवश्यक आहे. आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांकडून करिअर निवडताना अनेक गोष्टी चुकतात. याचे कारण म्हणजे शालेय जीवनात त्यांना पुणे, मुंबईसारख्या महानगरीत मिळणारे मार्गदर्शनाचा अभाव होय, असे प्रतिपादन प्रा. राजाराम परब यांनी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ विद्यालय, बांदा येथे पुणे येथील विचार एज्युकेशनचे डायरेक्टर विवेक गुप्ता ( बी. टेक – आयआयटी, मद्रास ) यांच्यावतीने आयोजित प्रशस्त मार्गदर्शन कार्यशाळा दरम्यान केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या सौ. माधवी सावंत, प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजाराम परब, विचार एज्युकेशनचे श्री. संदीप दिघे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील, पत्रकार निलेश मोरजकर आदी उपस्थित होते.

उपस्थित विध्यार्थी.

यावेळी प्रा. राजाराम परब यांनी विचार एज्युकेशन, पुणे द्वारा चालविण्यात येत असलेल्या नीट, जेईई, तसेच एमएचटी – सीईटी व अन्य स्पर्धात्मक परीक्षांची सविस्तर माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारा विद्यार्थ्यांना समजवून सांगितली.

आपल्या मार्गदर्शनात बोलताना प्रा. राजाराम परब पुढे म्हणाले की, कोकणातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच अपेक्षित करिअर घडवतील आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेला न्याय देऊ शकतील. विचार एज्युकेशन मार्फत महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर होतकरू व सामान्य विद्यार्थ्यांना तसेच विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जात आहे. कोकणातील विद्यार्थ्यांनी याचा सर्वाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. दरम्यान त्यांनी विचार एज्युकेशनल ॲप याबाबत देखील सविस्तर माहिती विशद केली.

 

प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सदर मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक प्रा. रुपेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जी. एम. काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन, संदीप दिघे यांनी केले. शीतल कांबळी, आशीष सावंत यांनी संयोजन केले.